इस्लामपूर : केंद्र शासनाने परदेशातून शेतीमालाची आयात केल्याने देशांतर्गत बाजारपेठेतील शेतमालाचे भाव कोसळले आहेत. उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळू लागल्यानेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण वाढले असून, त्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या हंगामात उसाला ३५०० रुपयांची पहिली उचल द्यावीच लागेल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी साखर कारखानदारांना दिला.ऊसदर हक्कासाठी २५ नोव्हेंबरपासून किल्ले शिवनेरीवरून सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचे आगमन आज (मंगळवारी) इस्लामपूर येथे झाले. यावेळी त्यांनी हुतात्मा, राजारामबापू व सर्वोदय साखर कारखाना येथे कारखानदार प्रतिनिधींशी संवाद साधून ३५०० रुपयांची पहिली उचल देणे कसे शक्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ऊस तोडणी मजुरांना समान काम, समान वेतन कायद्यानुसार हार्वेस्टर यंत्राइतकीच ऊस तोडणी मजुरी मिळाली पाहिजे. केंद्रीय कृषिमूल्य व उत्पादन खर्च आयोगाने चुकीच्या पध्दतीने मूल्यांकन केल्याने शेतकऱ्यांचे २२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून उसावर प्रतिटन ४००० रुपयांचा प्रत्यक्ष कर आकारला जातो. इतर अप्रत्यक्ष करांची यादी वेगळीच आहे. या करातील निम्मा वाटा शासनाने दिला, तर शेतकऱ्यांना ४००० रुपयांचा दर मिळेल. उत्पादन खर्च, नफ्यातील ५० टक्के वाटा व अतिरिक्त उताऱ्याचे ३०० रुपये गृहित धरून ३५०० रुपयांचा भाव देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन कृतीत आणावे. (वार्ताहर)सत्तासुंदरीची टाच दिसेनास्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर कोटी करताना रघुनाथदादांनी ‘पिंजरा’ चित्रपटातील आदर्श मास्तरची लावण्यवतीच्या नादाला लागून कशी वाताहत झाली, याची आठवण करून दिली. आज शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे स्वाभिमानीचे शिलेदार सत्तासुंदरीच्या नादाला लागले आहेत; मात्र अद्याप त्यांना या सत्तासुंदरीची टाचही दिसलेली नाही. त्यामुळे ‘यांच्या आदर्शाचा तोरा, त्यांचा कागद आहे कोरा’ अशी अवस्था झाल्याचा टोला पाटील यांनी मारला.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार
By admin | Updated: December 9, 2014 23:52 IST