लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी /शिवाजी सावंत
भुदरगड तालुक्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या प्रवीण व जयदीप डाकरे या दोन बंधूनी स्वकष्टाने ‘मोबाइल टीचर’ नावाचे अॅप विकसित केले आहे. त्यांचा हा उपक्रम लवकरच राज्यभर राबविला जाणार आहे. ९४२३३०९२१४ किंवा ९४०४९७४३५६ यापैकी कोणत्याही व्हाॅट्सअॅप नंबरला अंक पाठवा, तुम्हाला तत्काळ त्या अंकाच्या इयत्तेचा अभ्यास मिळेल.
विद्यामंदिर वेंगरूळ येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक प्रवीण डाकरे आणि विद्यामंदिर चाफेवाडी येथे कार्यरत असलेले जयदीप डाकरे या दोन बंधूंनी ऑनलाइन पद्धतीने सहज अभ्यास उपलब्ध व्हावे या उद्देशाने 'मोबाइल टीचर' नावाचे अॅप तयार केलेला आहे. इयत्ता पहिली ते सातवीसाठी अत्यंत उपयुक्त असा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण या उपक्रमाने सुलभ केले आहे.
एक कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भेट दिलेले हे देशातील एकमेव शैक्षणिक ॲप आहे. हे ॲप वापरासाठी पूर्णपणे मोफत आणि दर्जेदार आहे. पीडीएफ, ऑडिओ, व्हिडीओ आणि प्रत्यक्ष तासिकांमध्ये उपलब्ध असल्याने ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही वेळी वापरता येते. या उपक्रमात आठवी ते दहावीच्या फक्त दीक्षा लिंक समाविष्ट केलेल्या आहेत. यंदा हे ॲप अद्ययावत केल्याने विभागवार शिक्षकांच्या कामाची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला मिळणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये या उद्देशाने या उपक्रमाची निर्मिती केलेली आहे. फक्त व्हाॅट्सअप नव्हे तर ट्विटर, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, सिग्नल या सोशल माध्यमावर देखील दिलेल्या नंबरला वैयक्तिक मेसेज केल्यास अभ्यास तत्काळ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांमध्ये सुरुवातीला शासनाच्या दीक्षा ॲपच्या लिंक समाविष्ट केलेल्या असून घटकानुसार ऑडिओ, व्हिडीओ, ऑनलाइन टेस्ट अपडेट होत आहेत.
सध्या शासनाकडून दैनंदिन अभ्यासमाला, स्वाध्याय उपक्रम, ब्रिज कोर्स, सह्याद्री वाहिनीवरून ज्ञानगंगा कार्यक्रम, शैक्षणिक दिनदर्शिका असे अनेक उपक्रम सुरू असून त्यात 'मोबाइल टीचर' या नवीन उपक्रमाची भर पडलेली आहे. विद्यार्थी दिवसभरात कधीही संदेश पाठवून हव्या त्या घटकाचा अभ्यास करू शकेल. या उपक्रमाचे विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्याने पाठ्यपुस्तकातील घटकाचे नाव जरी टाइप करून पाठवले, तरीही त्या घटकाचा अभ्यास तत्काळ मिळतो.
पंचायत समितीच्या नूतन सभापती अक्काताई नलवडे यांच्या हस्ते या अद्ययावत अॅपचे उद्घाटन झाले. त्यांनी प्रवीण व जयदीप डाकरे या दोन बंधूंचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला.
१७ मोबाइल टीचर ॲप
फोटो ओळ
मोबाइल टीचर नावाचे सुसज्ज अॅप विकसित केल्याबद्दल डाकरे बंधूंचा सत्कार करताना अक्काताई नलवडे, जि. प. सदस्या रोहिणी आबिटकर, उपसभापती सुनील निंबाळकर गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले, विस्तार अधिकारी दीपक मेंगाने आदी.