गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चौथीत शिकणारा सार्थक पाटील घरी काहीही न सांगता सायकल घेऊन बाहेर पडला होता. सातच्या सुमारास त्याची शोधाशोध सुरू झाली. शेजारी, मित्रमंडळी, पै-पाहुणे यांच्याकडे कोणाकडेच सार्थकचा थांगपत्ता लागला नसल्याने सर्वांचीच काळजी वाढली. दरम्यान, त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आला. सोशल मीडियावरून त्याचा मेसेज वाऱ्यासारखा गावोगावी पोहोचला. त्याला शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू असताना सार्थक वाघबीळ घाटातील स्टँडवर सापडला आहे, असा फोन त्याच्या वडिलांना आला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सार्थक सायंकाळी सायकल चालवण्याच्या धुंदीत दालमिया कारखाना, कोतोली फाटा, पन्हाळा रोडवरून वाघबीळ घाटातून वाघबीळ फाट्यापर्यंत पोहचला. अंधार पडल्यावर सार्थक सैरभैर झाला होता. दरम्यान ८:३० च्या सुमारास कामावर जाण्यासाठी वाघबीळ फाट्यावर मित्राची वाटत पाहत बसलेल्या मिलिंद चटणे (रा.मसुदेमाले) यांना सार्थकच्या फिरण्याचा संशय आला. त्याचवेळी त्यांच्या व्हॉट्सॲपवर सार्थक बेपत्ता असल्याचा मेसेज पाहिला आणि त्याची विचारपूस केली. त्याला काहीच सांगता येत नसल्याने गोड बोलून वडिलांचा नंबर घेतला. तेव्हा मिलिंदने त्याच्या वडिलांना फोन करून मुलगा वाघबीळ फाट्यावर असल्याची माहिती दिली. त्यानंतर तीन तासांच्या शोधमोहिमेला सोशल मीडियामुळे पूर्णविराम मिळाला आणि सार्थक मिळाल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.