कोल्हापूर : केंद्र सरकारने लावलेल्या नवीन कराबाबत सराफ व्यावसायिकांमध्ये कमालीचा गैरसमज झाला असून, या करामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सहा कोटींपर्यंत उलाढाल असलेल्यांना यातून सवलत मिळाल्याने कारागीरांसह लहान उद्योजकांना त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे या कराचा बाऊ न करता आॅनलाईन भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय उत्पादन तथा सेवाशुल्क विभागाचे आयुक्त शेषगिरी राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. शेषगिरी राव म्हणाले, पात्र सराफ व्यावसायिकांनी आपली आॅनलाईन नोंदणी करून आॅनलाईनच पैसे भरायचे आहेत. त्यामध्ये उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांचा कुठेही हस्तक्षेप असणार नाही. हिरे, रत्न, माणिक, पाचू आदी जडित दागिने वगळता चांदीचे दागिने करमुक्त आहेत. जे कारागीर व सुवर्णकार निव्वळ मक्त्याने दागिन्यांची निर्मिती करतात त्यांना नोंदणी व विवरणपत्र सादर करण्याची गरज नाही. त्याची सर्व जबाबदारी ही मुख्य उत्पादकाची आहे. बारा कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाल्यास त्याला सहा कोटींपर्यंतची सवलत मिळणार नाही. सामान्य माणसांच्या मानगुटीवर कर लादल्याची तक्रार सुवर्णकार करत आहेत, पण सामान्य माणसे किती सोने खरेदी करतात? असा सवाल करत व्यावसायिकांनी आॅनलाईन सर्व बाबींची पूर्तता करावी, असे आवाहन केले. उपायुक्त श्यामधर, श्रद्धा जोशी, दुर्गेश साळुंखे, आदी उपस्थित होते.
नव्या कराबाबत सराफ व्यावसायिकांत गैरसमज
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST