कोल्हापूर : मिनी बसने दुचाकीला पाठीमागून किरकोळ धडक दिली. तशी अज्ञाताने मिनी बसच्या काचा फोडल्या, गोंधळ उडाला. हे तोडफोडीचे कृत्य दुचाकीचालकानेच केल्याचा गैरसमज होऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी दुपारी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौकात घडल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने सुमारे पाऊण तास परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी मिनीबस यादवनगर परिसरात काही प्रवाशांना सोडून सुभाषरोड मार्गे सावित्रीबाई हॉस्पिटल चौकातून पुढे जात होती. याचवेळी त्या मिनी बसची पुढील एका दुचाकीला किरकोळ धडक लागली. या धडकेत दुचाकीची नंबर प्लेट तुटली. त्याचवेळी रस्त्यावरील एका अज्ञाताने दुचाकीला धडक बसल्याचे निमित्त पुढे करून मिनी बसची तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. नागरीक मोठ्या प्रमाणावर जमा झाले. त्यावेळी ही तोडफोड संबंधित दुचाकीचालकानेच केली, या गैरसमजुतीतून नागरिकांनी त्या दुचाकीचालकाना बेदम मारहाण केली. नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. पोलीसही तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी नागरिकांच्या मारहाणीतून दुचाकीचालकाची सुटका केली. त्यामुळे तणाव निवळला.
फोटो नं. २३०२२०२१-कोल-व्हॅन तोडफोड
ओळ: कोल्हापुरात सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौकात मिनी बसची केलेली तोडफोड.