कोल्हापूर : जवाहरनगर येथे घरासमोरील गटारीतील घाण काढण्याच्या वादातून सराईत गुन्हेगाराने लॉन्ड्री व्यावसायिकाच्या डोक्यात दगड घालून खुनी हल्ला केला. रमेश आनंदराव शिंदे (वय ४९) असे जखमीचे नाव आहे. शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृत्ती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेनंतर काही तासांतच संशयित आरोपीला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. विनायक कृष्णात सोनवणे (३६) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रमेश शिंदे व विनायक सोनवणे या दोघांची घरे एकमेकाला लागून आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून घरासमोरील गटारीतील घाणीवरून वाद आहे. शिंदे घरामध्येच लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात. सोनवणे हा आई अलका व बहीण पूजा यांच्यासोबत राहतो. शुक्रवारी शिंदे व सोनवणे यांच्यात वादावादी झाली. याप्रकरणी शिंदे रात्री अकराच्या सुमारास राजारामपुरी पोलिस ठाण्यात सोनवणेच्या विरोधात फिर्याद देण्यास गेले असता पोलिसांनी दुर्लक्ष केले. शनिवारी सकाळी शिंदे लक्ष्मीपुरीत कामगाराला आणण्यास गेले. तेथून घरी आले असता दारात सोनवणे बसला होता. यावेळी त्यांना पाहून थांब तुला सोडत नाही, असे म्हणून अंगावर धावून जात रस्त्यावर खाली पाडले. यावेळी सोनवणेच्या आईने सोडू नको त्याला, असे म्हणून चिथावणी देताच त्याने शिंदेच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. प्रफुल्ल शेरखाने हे सोडविण्यास गेले असता त्यांनाही धक्काबुक्की करीत दगड अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. जिवाच्या भीतीने शेरखाने पळून गेले. नागरिकांनी धाव घेत जखमी शिंदे यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना खासगी रुग्णालयात हलविले. डोक्यात वर्मी घाव लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, राजारामपुरीचे निरीक्षक अमृत देशमुख व सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी घटनेची माहिती घेत हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांकडून आरोपीची पाठराखण संशयित विनायक सोनवणे याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गुंडगिरी, हत्यार बाळगणे, आदी गुन्हे दाखल आहेत. त्याला खुनाच्या गुन्ह्णात पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. यापूर्वी त्याने सुप्रिया प्रफुल्ल शेरखाने व त्यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला केला होता. यासंबधी त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दोनवेळा तक्रार दिली; परंतु पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्याकडे दुर्लक्ष केले. वेळोवेळी जवाहरनगर परिसरातील नागरिक सोनवणे याच्या विरोधात फिर्याद देण्यास गेले असता पोलिस त्याची पाठराखण करीत होते. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा खुनी हल्ला झाल्याचा आरोप शेरखाने कुटुंबीयासह परिसरातील नागरिकांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)
जवाहरनगरात लॉन्ड्री व्यावसायिकावर खुनी हल्ला
By admin | Updated: June 5, 2016 01:10 IST