हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीने शहराच्या मध्यवस्तीमध्ये वसलेल्या शाहूनगर या दलित वसाहतीमध्ये असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धिकरण केंद्रानजीकच ‘डंपिंग ग्राऊंड’ उभारल्यामुळे रौप्यनगरीचे आरोग्य धोक्यात येणार आहे. परिणामी, ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शाहूनगर वसाहतीतील कचऱ्याचा उठाव त्वरित करावा, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते जयकुमार मंगलराव माळगे यांनी दिला आहे.ग्रामपंचायतीने शहरातून उचललेल्या कचरा शहराच्या मध्यभागी वसलेल्या शाहूनगरामध्ये जलशुद्धिकरण केंद्रानजीक आणून टाकला आहे. या परिसरात बौद्ध विहार, अंगणवाडी, ईदगाह मैदान, सांस्कृतिक सभागृहे, नळ पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ, जलशुद्धिकरण केंद्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, त्यांच्या पवित्र अस्तींचे जतन करण्यासाठी उभारण्यात आलेली मिनी चैत्यभूमी, रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाबरोबरच दाटीवाटीने वसलेली हजारो नगरिकांचा शाहूनगर वसाहतीचा परिसर आहे. या ठिकाणचा कचरा वाऱ्याने उडून जलशुद्धिकरण केंद्रामध्ये जात असल्याने संपूर्ण रौप्यनगरीवासीयांचेच आरोग्य धोक्यात येण्याचा धोका संभवतो आहे. येथे सर्वत्र घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य आहे. भटकी कुत्री, डुकरे, आदींनी उच्छाद मांडला आहे. याप्रश्नी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी, रौप्यनगरीवासीयांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते जयकुमार माळगे म्हणाले, ग्रामपंचायतीने शाहूनगर वसाहतीमध्ये कचरा साठवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. कचऱ्याचा उठाव करावा, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.याबाबत उपसरपंच धर्माजी कांबळे म्हणाले, येत्या दोन दिवसांत पोकलॅन मशीनच्या साह्याने संपूर्ण कचरा उचलण्यात येणार आहे. नागरिकांना त्रास होणार नाही. याबाबतची काळजी ग्रामपंचायत प्रशासन निश्चितपणे घेत आहे.
हुपरीत मध्यवस्तीतच कचऱ्याचे डंपिंग ग्राऊंड
By admin | Updated: April 2, 2016 00:02 IST