विविध ठराव : साडेचार कोटींच्या रस्ते कामांना मंजुरीआष्टा : आष्टा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील साडेचार कोटीच्या रस्ते कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी माजी आमदार विलासराव शिंदे, नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे, उपनगराध्यक्ष दादा वग्याणी उपस्थित होते. आष्टा पालिकेच्या १६१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेची सभा पालिकेऐवजी आष्टा-इस्लामपूर रस्त्यावरील विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल येथे झाली.आष्टा शहरातील अंतर्गत रस्ते, विस्तारित भागातील रस्ते व मळी भागातील रस्ता काम अनुदानातून सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चून करण्यास मान्यता देण्यात आली. रोजगार हमीची कामे करण्यास ‘क’ वर्ग नगरपरिषदेस मान्यता मिळाल्याने भविष्यात पालिकेच्यावतीने रोजगार हमीची कामे करण्यास मान्यता देण्यात आली. शासकीय जागेत वास्तव्य करून पालिकेविरुध्द न्यायालयात जाणाऱ्या नागरिकांना पालिकेच्यावतीने पाणी कनेक्शन देण्यात येणार नाही.आष्टा बसस्थानकासमोरील सोमाजी ढोले बकरी संगोपन व लोकर उत्पादक संघास सुमारे १0 एकर ७ गुंठे जमीन आणखी तीस वर्षासाठी देण्यास पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी नीलेश देशमुख व नवीन नियुक्ती झालेले मुख्याधिकारी पंकज पाटीलही अनुपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी भोजनाचा आनंद घेतल्यानंतर येथेच पालिकेची बैठक झाली. (वार्ताहर)
आष्टा पालिकेची पहिल्यांदाच कार्यालयाबाहेर झाली सभा
By admin | Updated: August 11, 2014 23:33 IST