कोल्हापूर : येथील भाऊसिंगजी रोडवरील व्यापारी संकुलाबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्याचा निर्णय राधानगरी येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेतला. राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
या सभेला सभापती वंदना जाधव, रसिका पाटील, शिवानी भोसले, कोमल मिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी व्यापारी संकुलाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी चव्हाण यांनी, माहिती घेतो असे सांगितले. मात्र यातील ११ जणांनी दावे मागे घेतले आहेत. आराखडा तयार आहे, केवळ प्रशासनाच्या अनास्थेमुळे यावर काही काम होत नाही, असा आरोप केला. यानंतर चव्हाण यांनी पुढील आठवडयात बैठक घेत असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा केवळ आढाव्यासाठी बैठक नको, तर पुढची प्रक्रियाच या बैठकीतून सुरू करा, अशी सूचना केली.
ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी पंधराव्या वित्त आयोगाचा मुद्दा उपस्थित केला. ग्रामपंचायती, पंचायत समित्यांचा निधी खर्च झाला तरी आम्हाला निधी मिळाला नाही, अशी विचारणा केली. तेव्हा सोमवारनंतर सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. इंगवले यांनीच यावेळी मुख्यालयातील प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. सर्वसाधारण सभेत या कर्मचाऱ्यांना मुख्यालयात ठेवायचे नाही असे ठरले होते. त्याचे पुढे काय झाले, अशी विचारणा केली. याची यादी तयार असून लवकरच निर्णय होईल असे सांगण्यात आले.
यावेळी सदस्य युवराज पाटील, बजरंग पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
सिरिंज उपलब्ध
लसीकरणासाठी सिरिंज उपलब्ध नसल्याबद्दल इंगवले यांनी विचारणा केली. तेव्हा सिरिंजची टंचाई होती. परंतु त्यासाठी तालुका पातळीवर निधी उपलब्ध करून दिल्याचे डॉ. योगेश साळे यांनी सांगितले.