कोल्हापूर : साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिकांचे न राहता चित्रकला, शिल्पकला या कलांचे सादरीकरण संमेलनस्थळी केले जाणार आहे. यंदाच्या संमेलनात साहित्य व कला या क्षेत्रातील विचारांची देवाण-घेवाण व ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी सोमवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २७ वे साहित्य संमेलन दि. ९ जानेवारीपासून राजाराम महाविद्यालयाचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि आवारात संमेलनानिमित्त उभारलेल्या ‘राजर्षी शाहू नगरी’ येथे होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता हिंदी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या हस्ते होणार आहे. यापूर्वी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथदालनाचे उद्घाटन करणार आहेत. प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, ‘नॅक’चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील उपस्थित असणार आहेतसंमेलनाच्या आदल्या दिवशी (दि. ८) दुपारी ३ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर व परिसरातील शालेय मुलांचा सहभाग त्यामध्ये असणार आहे, तसेच सीमाभागातील साहित्य संमेलन दिंडी, शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील साहित्यदिंडी, डोंगरी साहित्यदिंडी, शब्दांगण ग्रंथदिंडी, सह्याद्री साहित्य संमेलन दिंडी अशा पाच ठिकाणांहून येणाऱ्या ग्रंथदिंडी संमेलनात सहभागी होतील. दि. ९ व १० डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या संमेलनात पहिल्या दिवशी दुपारी १२.३० वाजता ‘कथाकथन’, दुपारी ३ वाजता ‘मराठीचे भवितव्य आणि प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद, दुपारी ३.३० वाजता ‘कविकट्टा प्रारंभ’, सायंकाळी ५ वाचता ‘शब्दसुरांच्या झुल्यावर- कोल्हापूरची कविता’, ‘स्वरनिनाद’तर्फे कोल्हापूरच्या कवींच्या कवितांचा स्वरबद्ध आविष्कार, रात्री ८.३० वाजता ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’ हे कार्यक्रम होतील.१० डिसेंबरला सकाळी ‘चित्र-शिल्प-काव्य’ या कार्यक्रमात व्यासपीठावर एकाचवेळी चित्रकला, शिल्पकलेचे नमुने व कविता सादर केल्या जाणार आहेत. सकाळी ११.३० वाजता ‘शाळकरी मुलांचा साहित्य आविष्कार’, दुपारी १२.३० वाजता ‘कादंबरीकार श्याम मनोहर यांची प्रकट मुलाखत’, दुपारी ३ वाजता ‘महाराष्ट्र सहिष्णू आहे का’ या विषयावर परिसंवाद व महाराष्ट्र फाऊंडेशन जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्या बाळ यांचा सत्कार, सायंकाळी ५ वाजता ‘समारोप’ हे कार्यक्रम होतील. या संमेलनाला विचारवंत, साहित्यिक, लेखक, कवी यांच्याशी वाचकांचा संवाद होण्यास मदत होईल. यावेळी ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नलगे, दळवीज आर्टस्चे अजेय दळवी, व्ही. बी. पाटील, कोल्हापूर आर्ट फौंडेशनचे प्रशांत जाधव, ‘रंगबहार’चे विजय टिपुगडे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह गोविंद पाटील, डॉ. विनोद कांबळे, आदी उपस्थित होते.
‘दमसा’चे संमेलन ९ जानेवारीपासून
By admin | Updated: December 29, 2015 00:39 IST