लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोळ : नगरपालिका व आरोग्य प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर शहरातील व्यापारी व भाजी विक्रेत्यांकडून अॅन्टिजन तपासणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी आणखी काही व्यापारी व अन्य दुकानदार तसेच लक्षणे असणाऱ्या व्यक्तींसह ११० जणांची अॅन्टिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये मटण विक्रेत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर संपर्कातील एका मुलीचा अहवालही पॉझिटिव्ह आला.
येथील शिवाजी तख्तामध्ये नगरपालिका व ग्रामीण रुग्णालयाकडून शनिवारी अॅन्टिजन तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १२४ जणांची तपासणी करण्यात आली होती. एका आरोग्य कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला तत्काळ विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले. शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने जनजागृती सुरु केली आहे. व्यापारी, भाजी विक्रेते यांची अॅन्टिजन तपासणी केली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त तपासण्या करण्यावर भर दिला जात आहे. सोमवारीही ११० जणांची अॅन्टिजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, लक्षणे असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने अॅन्टिजन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.