कोल्हापूर :देशातील दलित भविष्यात एकत्र आल्यास त्याचे नेतृत्व मायावती यांनी करावे, कारण त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद दोन्ही आहे, अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
आठवले पुढे म्हणाले, दलित समाजाचे विखुरलेले राजकारण एकत्र करण्याची गरज आहे. संविधानाने अधिकार व आरक्षण दिले असले तरी अनेक ठिकाणी भेदभाव सुरूच आहे. दलितांना स्वतंत्र राजकीय आवाज मिळायला हवा.
भाजपसोबतच्या युतीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, मोदी सरकारने दलितांसाठी अनेक योजना राबवल्या असून, ही भागीदारी सकारात्मक ठरली आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुतीने जागा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
एक ठाकरे आमच्याकडे येतील
रामदास आठवले यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवरही भाष्य केलं आहे. यातील एक ठाकरे आमच्याकडे येतील असा दावा तूनी केला. पण ‘दोन्ही ठाकरे बंधु जरी एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर बिलकुल परिणाम होणार नाही. उलट महायुतीला फायदाच होईल. दोन्ही ठाकरेंच्या सगळीकडे बातम्या येतील, मात्र महाराष्ट्रासह मुंबई महानगरपालिकेत त्यांना अजिबात यश मिळणार नाही. मुंबई महानगरपालिकेवर यंदा महायुतीचाच झेंडा फडकणार आहे.’
प्रकाश आंबेडकरांसोबत युती करणार का?
रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्याबाबतही भाष्य केले आहे. ‘मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आलो तर दलित समाजाला अत्यानंद होईल. यामुळे महाराष्ट्राच्या उलथापालथ होईल. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तिन्ही नातू तीन गटात आहेत. ते कधी ऐक्यासाठी उत्सुक नव्हते. आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे आम्ही दोघे एकत्र येणे अशक्य आहे’ असं ते म्हणाले.
संजय राऊत खोटारडे
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्ष निरर्थक मुद्दे पुढे करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, अशी टीका केली. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यांना गांभीर्याने न घेण्याचा सल्ला देत आठवले म्हणाले की ते नेहमी खोट्या व निरर्थक गोष्टी बोलतात. जे राहुल हांधी मत चोरी बद्दल बोलतात त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी मते राखता आली नाहीत असा टोला हाणला.