माउलींनी घेतला साताऱ्यातून निरोप पावसाला मुक्कामी पाठविण्याचे साकडे वाठार निंबाळकर : सातारा जिल्ह्यातील पाचवा मुक्काम बरड, ता. फलटण येथे आटपून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जाताना हजारो सातारकरांनी पाऊस मुक्कामी पाठवून देण्याचे साकडे माउलींकडे घातले. चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहु डोळे निवती कान, मला तेथे समाधान, संता महता होतील भेटी, आनंदी नाचु वाळवंटी... संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे संत महंत व पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन निघालेला पालखी सोहळा मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचला. तत्पूर्वी बरड ग्रामस्थांनी ‘साधूसंत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा’ या उक्तीप्रमाणे वारकऱ्यांची मनोभावी सेवा केली. पालखी सोहळा सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील राजुरी येथे पोहोचला. तेव्हा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, तहसीलदार विवेक जाधव, गटविकास अधिकारी निलेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पोटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सरोदे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरावरील विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. राजुरी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच डॉ. मधुकर माळवे, जयकुमार इंगळे, पंचायत समिती सभापती स्मिता सांगळे, विनायक पाटील यांनी स्वागत केले. (वार्ताहर)
माउलींनी घेतला साताऱ्यातून निरोप
By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST