कोल्हापूर : कोरोनापासून संरक्षण म्हणून तोंडावर मास्क आला तरीही रस्त्यावरील थुंकणे कमी झाले नसल्याचे खेदजनक चित्र आजही कोल्हापुरात दिसत आहे. सरसकट थुंकणे कमी झाले असले तरी ते पूर्णत: बंद झालेले नाही. मास्क खाली ओढून अजूनही पिचकारी मारणारे बहाद्दर आहेतच.
मास्क लावल्यामुळे कोरोनापासून बचाव तर होतोच परंतु धुळीपासूनही बचाव होत आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्दी होण्याचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे. हा मास्कचा जादा आरोग्यदायी लाभ आहे. त्यामुळेच मास्क लावल्याने लोकांचे थुंकण्याचे प्रमाण कमी झाले का? हे ‘लोकमत’ने चेक केले तर वस्तूस्थिती त्याच्या उलटी दिसून आली. लोक मास्क खाली घेऊन (भले मास्क रंगला तरी चालेल) सार्वजनिक ठिकाणी अजूनही पिचकाऱ्या मारत आहेत. गुटखा-तंबाखू दाढेत धरून गाडीवर बसणाऱ्यांचे प्रमाण समाजात जास्त आहे. त्यामुळे वाहन चालवता चालवताच मास्क खाली ओढून लोक थुंकीची पिचकारी मारत असल्याचे चित्र दिसते. त्यांची पिचकारी रोखायची असेल तर प्रबोधनासह दंडात्मक कारवाईची गरज आहे.
रस्त्यावर थुंकू नये, याकरिता कोल्हापुरातील चौकाचौकात ‘थुंकीमुक्ती’ची चळवळ सुरु झाली आहे. अन्य लोकांना थुंकण्यामुळे होणाऱ्या आजारांबद्दल जनजागृती करण्यात आली. काहीकाळ ही मोहीम सर्वत्र चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली. मात्र, कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून प्रत्येकाच्या तोंडावर मास्क आले. पहिल्या लाटेत अनेकांनी रस्त्यावर थुंकणे थांबवलेही. आता गुटखा, मावा, तंबाखू खाऊन लोक थुंकणार नाहीत, अशी आशा सर्वसामान्य कोल्हापूरकरांना वाटली. परंतु, लोकांची सवय जात नाही.
---
महापालिका प्रशासनाने विनामास्कसारखी दंडात्मक कारवाई करून त्यांची नावे वृतपत्रातून सर्वत्र प्रसिद्ध करावीत. सातत्याने ही कारवाई केली तर नक्कीच शहर थुंकीमुक्त होईल.
- दीपा शिपूरकर,
संस्थापिका, थुंकीमुक्ती चळवळ, कोल्हापूर