कोल्हापूर : राज्य सरकारने फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमार्फत आज, सोमवारी एक दिवस बंद करण्यात येणार आहे. माथाडी कामगार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देणार आहेत, तसेच दुपारी चार वाजता बाजार समितीच्या दारात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. फळे व भाजीपाल्यावरील नियंत्रण उठविल्याने बाजार समित्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर माथाडी कामगारांनाही फटका बसणार आहे. यासाठी समित्या व माथाडी कामगार आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला बाजार समिती कामगार संघानेही पाठिंबा दिल्याने समित्यांचे कामकाज ठप्प होणार आहे. माथाडी कामगार सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून निवेदन देणार आहेत. सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देत शेती उत्पन्न बाजार समित्या आणि माथाडी आंदोलनाला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आक्रमक झाली आहे. (प्रतिनिधी)
बाजार समिती आज बंद
By admin | Updated: July 4, 2016 00:37 IST