हातकणंगले नगरपंचायत कर्मचारी आकृतीबंध नगरविकासकडून मंजूर झाला नसल्याने विविध शासकीय कामाबरोबर आरोग्य, कर वसुली, नागरी सुविधांसह औद्योगिक वसाहतीना सुविधा पुरवण्यासाठी नगरपंचायतीची त्रेधात्रिरपीट उडाली आहे.
हातकणंगले ग्रामपंचायतीचे दीड वर्षापूर्वी नगरविकास विभागामार्फत नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. ऑक्टोबर २०१९ मध्ये नगरपंचायतीची पहिली निवडणूक पार पडली. नगरपंचायतीला कर्मचारी आकृतीबंधानुसार ४० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यामध्ये लिपीक आणि टंकलेखक ५ , स्वच्छता निरीक्षक -२ , वायरमन १, मुकादम -१ , शिपाई -५ , व्हॉलमन -४ , गाळणी चालक ४ , पंप ऑपरेटर -२ , चालक -२ व आरोग्य कर्मचारी १ अशा चाळीस कर्मचाऱ्यांची अवश्यकता आहे. सध्या नगरपंचायतीकडे २४ कर्मचारी असल्यामुळे नागरी सुविधांसह विकासाची सर्व कामे ठप्प आहेत.
हातकणंगले ग्रामपंचायतीचे ‘नगरपंचायत’मध्ये रूपांतर होऊन दीड वर्ष पूर्ण झाले. तरीही कर्मचारी आकृतीबंध मंजूर झालेला नाही.
कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रशासकीय कामकाज करणे, आरोग्य सुविधा पुरविणे, कर वसुली करणे अडचणीचे ठरत आहे.
चौकट
नगरपंचायतीचा ४० कर्मचारी आकृतीबंध मंजूर करावा यासाठी तालुका मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष सागर पुजारी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालय मुंबई आणि कोल्हापूर दौऱ्या वेळी लेखी निवेदन देऊन कर्मचारी आकृतीबंध मंजूर करावा अशी मागणी करुन ही नगरविकासकडून मंजुरी मिळालेली नाही.
कोट
शासनाच्या आकृतीबंधानुसार कर्मचारी मंजूर व्हावेत अशी शासनाच्या नगरविकास विभागाकडे वारंवार लेखी मागणी करूनही मंजुरी मिळत नाही. यामुळे नगरविकासाच्या सुविधा पुरविणे अडचणीचे ठरत आहे. शासनाने कर्मचारी आकृतीबंध् तत्काळ मंजुर करावा.
अरूण जानवेकर, नगराध्यक्ष, हातकणंगले नगरपंचायत.