कसबा बावडा : नेत्यांनी ठरवून दिलेला कार्यकाल संपला असल्याने करवीर पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी भगवान पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल पाटील यांच्याकडे सोमवारी दिला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा तालुक्यात रंगली होती. आता नवीन सभापती निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या मंगल आनंदराव पाटील ( नेर्ली ) यांना सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
करवीर पंचायत समितीवर पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील गटाची सत्ता आहे. एकूण २२ सदस्यांपैकी १४ सदस्य हे काँग्रेसचे आहेत. त्यापैकी सतेज पाटील गटाचे ७ व पी. एन. पाटील गटाचे ७ सदस्य आहेत. याशिवाय शिवसेना ४, भाजप ३, राष्ट्रवादी १ असे एकूण २२ सदस्य आहेत.
पंचायत समितीवर पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील गटाची सत्ता असल्याने एका गटाला सभापती तर दुसऱ्या गटाला उपसभापती पदाची संधी दिली जाते. तसेच पदाचा कालावधीही ठरवला जातो. सध्या अध्यक्षपद सतेज पाटील गटाकडे आहे. त्यांनी या मिळालेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये दोन सदस्यांना सभापती पदाची संधी देण्याचे ठरवले होते. त्यानुसार विद्यमान सभापती मीनाक्षी पाटील यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. आता उर्वरित कालावधीसाठी सभापती पदावर मंगल पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.