कोल्हापूर : कोल्हापूर क्रिडाईच्या विनंतीस मान देऊन तब्बल पावणेदोन वर्षे अडकलेल्या नवीन एकसमान बांधकाम नियमावली (युनिफाईड बायलॅाज) च्या मसुद्याला मान्यता दिल्याबद्दल खासदार संजय मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला. खासदार मंडलिक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे येथे ‘क्रिडाई’च्या शिष्टमंडळासमवेत भेटून केलेल्या आग्रही मागणीनुसार या नियमावलीस मंजुरी देण्याचा निर्णय झाला.
राज्यात प्रत्येक नगरपालिका व महापालिकेतील बांधकाम नियम वेगळे होते. यातही अनेक त्रुटी होत्या. यामुळे बांधकाम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. म्हणून संपूर्ण राज्यात बांधकामाबाबत एकसमान नियमावली असावी अशी मागणी होत होती. एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार युनिफाईड बायलॉजच्या अंमलबजावणीस हिरवा कंदील दाखवला होता व त्याबाबतच्या मसुद्याला मान्यता देऊन याबाबतच्या नियमावलीचा आदेश राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला. राज्यातील १० हजार बांधकाम प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारच्या या निर्णयाने बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळणार आहे.
यावेळी ‘क्रिडाई’चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव रविकिरण माने, गौतम परमार, प्रदीप भारमल, शिवाजी संकपाळ, श्रेयश मगदूम, सारंग नालंग, राजेश आडके, पवन जमादार, विश्वजित जाधव, अयोध्या डेव्हलपर्सचे नितीन पाटील, ॲड. सुरेश कुराडे, रमण राठोड, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : एकसमान बांधकाम नियमावलीस मान्यता मिळवून दिल्याबद्दल खासदार संजय मंडलिक यांचा सत्कार ‘कोल्हापूर क्रिडाई’च्या वतीने करण्यात आला. यावेळी राजेश आडके, पवन जमादार, श्रेयश मगदूम, सारंग नालंग, विद्यानंद बेडेकर, रविकिरण माने, सुरेश कुराडे, आदी उपस्थित होते. (फोटो-०६१२२०२०-कोल-मंडलिक)
- राजाराम लोंढे