सचिन लाड - सांगली -जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख नेहमीच चढ-उताराचा राहिला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत माजविणे, खंडणी, लूटमार आणि सावकारीच्या माध्यमातून गुन्हेगारी नेहमीच फोफावत राहिली. एक-दोन नव्हे, तब्बल डझनभर गुन्हे दाखल होऊनही गुन्हेगारांना कायद्याची कोणतीच भीती राहिली नव्हती. मात्र जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याचे हत्यार उपसल्याने या गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली आहे. गेल्या अडीच वर्षात सात टोळ्यांतील ४५ जणांना मोक्का लागल्याने ‘मोक्का’ कायदा गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच कारवाई झाली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नजर टाकली, तर एखादा अपवाद सोडला तरच गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही. खून करून दोन महिन्यात ते जामिनावर बाहेर आलेले आहेत. त्यानंतर त्यांचा गुन्हेगारीचा प्रवास सुरूच राहिला. भीतीच न राहिल्याने त्यांची समाजात दहशत वाढत गेली. पोलीस मात्र केवळ गुन्हे दाखल करून गुन्हेगारांना अटक करण्याशिवाय काहीच करीत नव्हते. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख रितेशकुमार यांनी २००० मध्ये गुंड राजा पुजारी व दाद्या सावंत टोळीतील दहाजणांना मोक्का लावला होता. तीन-चार वर्षे ते कारागृहात होते. त्यानंतर पुन्हा सावंत यांच्या काळातच मोक्काची कारवाई यशस्वी झाली आहे. अडीच वर्षापूर्वी सावंत यांनी पोलीसप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली. अवघ्या दोन महिन्यातच त्यांनी शिंदे मळ्यातील रेल्वे ब्रीज व गोकुळनगरजवळ लोकांना अडवून लुटणाऱ्या इसर्डे टोळीतील सातजणांना मोक्का लावला. तेव्हापासून ही टोळी कारागृहातच राहिल्याने एकही लुटीची घटना घडली नाही. करेवाडी (ता. जत) येथील करे टोळीने जत तालुक्यात लूटमार व दरोडे टाकून धुमाकूळ घातला होता. या टोळीतील तब्बल १५ जणांना मोक्का लावला. सावकारीचा व्यवसाय करून व्याजापोटी गोरगरिबांची घरे व जमिनी बळकाविणाऱ्या कुपवाडच्या भोला जाधव टोळीतील सहाजणांविरुद्ध सातपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्याविरुद्धही मोक्का लावला. सावकारी टोळीला मोक्का लागल्याची राज्यातील ही पहिली कारवाई ठरली. तुपारी (ता. पलूस) येथील सराईत गुन्हेगार पांडुरंग घाटगेसह दोघांवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली. त्यानंतर दरोडा व लूटमार टोळीचा म्होरक्या बबलू जावीर टोळीतील पाच, विनायक काकडे टोळीतील सात व गेल्या आठवड्यात कुपवाडच्या सुनील दुधाळ टोळीतील तिघांना मोक्का लागला. सातत्याने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कायदा काय असतो, हे या कारवाईतून दाखवून दिले आहे. आतापर्यंत सात टोळ्यावर केलेली ‘मोक्का’ची एकही कारवाई अपयशी ठरली नाही. सात टोळ्यांतील ४५ गुन्हेगार कारागृहात गेल्याने गुन्हेगारीला आळा बसला आहे. - दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुखआणखी एका टोळीविरुद्ध प्रस्तावपोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी जिल्ह्यातील सावकारांवरही कारवाईचा बडगा उगारला. वर्षभरात सव्वाशे सावकारांवर कारवाई केली. सावकारांनी बळकाविलेली मालमत्ता गोरगरिबांना मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कारवाईच्या भीतीने अनेक सावकारांनी लोकांची मालमत्ता गुपचूप परत केली. त्यानंतर ४७ गुन्हेगारांना ‘मोक्का’ लावण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोक्काअंतर्गत कारवाई प्रथमच झाली आहे. आणखी एका टोळीस मोक्का लावून अर्धशतक पूर्ण करण्यासाठी सावंत यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना सादर केला जाणार आहे.
‘मोक्का’ कारवाई अर्धशतकाकडे...
By admin | Updated: April 13, 2015 00:04 IST