कोल्हापूर : लक्ष्मीपुरी, रविवार पेठ येथील ‘छत्रपती फेटे’ या प्रसिद्ध दुकानाचे मालक महंमदहनीफ असगरअली रंगरेज (वय ९०) यांचे गुरुवारी निधन झाले. ‘रंगारी मामू’ म्हणून परिचित असणारे रंगरेज कापड रंगकाम आणि लहरी फेटे व्यवसायात ७० वर्षे कार्यरत होते. फेट्यांच्या माध्यमातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे वडील छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात वाड्यावर रंगीत फेटे घेऊन जात व बांधत असत. वडिलांकडून फेटे बांधण्याची कला शिकलेल्या महंमदहनीफ यांनी देशभरातील अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सर्व क्षेत्रांतील मान्यवरांना फेटे बांधले. मराठी चित्रपटातील वेशभूषेसाठी लागणाऱ्या साड्या रंगविण्याचेही काम त्यांनी अनेक वर्षे केले. कोल्हापुरी फेटे सातासमुद्रापार नेण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. जियारत विधी आज, शुक्रवारी आहे.
१४०१२०२१ कोल महंमदहनीफ रंगरेज