बाहुबली : बाहुबली (ता. हातकणंगले) येथे ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१५ या काळात भगवान बाहुबलींच्या २८ फुटी मूर्तीस महामस्तकाभिषेक करण्यात येणार आहे. प्रत्येक बारा वर्षांनी या मूर्तीस महामस्तकाभिषेक घालण्यात येतो. यंदाचा महामस्तकाभिषेक सुवर्णमहोत्सवी असल्याने देशभरातून पाच लाख जैन बांधव उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे.प. पू. १०८ समंतभद्र महाराजांनी जैन धर्माच्या प्रसारासाठी बाहुबली (ता. हातकणंगले) येथे १३ जुलै १९३४ रोजी बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ गुरुकुलाची स्थापना केली. तसेच १९६३ साली २८ फूट भगवान बाहुबलींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. यंदा या मूर्तीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच १०८ समंतभद्र महाराजांनी १८ आॅगस्ट १९८८ रोजी समाधी घेतली होती. त्यासही २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष साजरे करण्यात येत आहे. अशा दोन्ही मंगल महोत्सव धार्मिक वातावरणात पार पाडण्याचे नियोजन केले आहे.महामस्तकाभिषेकासाठी क्षुल्लक समर्पणसागरजी महाराजांची मुख्य उपस्थिती असणार आहे. संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या निर्देशनाखाली होणार आहे. शिवाय सांगली, कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यांतील जैन समाज, दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, माजी गुरुकुल स्नातक, इत्यादी संघटनांचे सहकार्य आयोजनास मिळत आहे. महामस्तकाभिषेक समितीचे कार्याध्यक्ष, माजी जि. प. अध्यक्ष व संस्थेचे महामंत्री डी. सी. पाटील हे आहेत. कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, सनतकुमार आरवाडे, धनराजजी बाकलीवाल, बाबासाहेब पाटील, बी. टी. बेडगे, गोमटेश बेडगे, तात्यासोा अथणे व अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन होणार आहे.
बाहुबलीमध्ये होणार महामस्तकाभिषेक
By admin | Updated: December 10, 2014 23:48 IST