मित्तल म्हणाले, शुक्रवारी सकाळी शाहू छत्रपती टर्मिनस कोल्हापूर स्थानकास भेट दिली. या भेटीनंतर जयसिंगपूरजवळील रेल्वेमार्गावर करण्यात आलेल्या विद्युतीकरणासह कृष्णा नदीजवळील रेल्वे पुलाच्या मजबुतीकरणाच्या कामाची पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर ते मिरज स्थानकांदरम्यान प्रलंबित राहिलेली कामे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. यामध्ये स्थानकांचे नूतनीकरण, विद्युतीकरण, दुहेरीकरण आणि अन्य तांत्रिक सुविधांचा समावेश आहे. कोरोनाकाळामध्ये अनेक रेल्वेंच्या सेवा थांबल्या आहेत. त्याबाबत राज्य शासनाशी रेल्वे विभागातर्फे समन्वय साधून टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा पूर्ववत केल्या जातील. ज्या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होऊ शकते, अशा ठिकाणच्या रेल्वेसेवा त्वरित सुरू करण्याला प्राधान्य दिले जाईल. कोल्हापूर-मुंबई दरम्यानच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली महालक्ष्मी एक्सप्रेस येत्या १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू केली जाईल. कोल्हापूर रेल्वेस्थानकास भेट दिली. त्यादरम्यान खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने व आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत विविध प्रलंबित प्रश्नांसंबंधी चर्चा केल्याची माहितीही त्यांनी दिली.
मित्तल यांनी शुक्रवारी सकाळी कोल्हापूर शाहू छत्रपती टर्मिनस, कोल्हापूर रेल्वेस्थानकास भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी जयसिंगपूरजवळील विद्युतीकरणासह कृष्णा नदीजवळील रेल्वे पुलाच्या मजबुतीकरणाच्या कामाची पाहणी केली. या पाहणीवेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव यांच्याशी मित्तल यांनी विविध प्रश्नी चर्चा केली.
कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर एमएमआरडीसीकडून महारेल प्रकल्पाअंतर्गत नवीन रेल्वेमार्ग टाकण्याचा प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव अद्याप आमच्यापर्यंत आलेले नाही. त्यात तांत्रिक किंवा अन्य मदत हवी असेल तर निश्चितच मध्य रेल्वे ती पुरवील. मध्य रेल्वेकडे प्रवासी, मालवाहतुकीतून २०१९ या सालात ५५०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. यंदा मात्र, कोरोनामुळे केवळ १५०० कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला आहे. ही तूट लवकरच भरून निघत आहे. सर्व रेल्वेगाड्या राज्य शासनाशी समन्वय साधून व मागणीप्रमाणे सुरू केल्या जात आहेत. या पत्रकार परिषदेस पुणे विभागाच्या मंडल प्रबंधक रेणू शर्मा उपस्थित होत्या.