सतीश पाटील ल्ल शिरोली माले येथे झालेल्या अपघातात मादळे (ता. करवीर) येथील आठजण ठार झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, गावच सुन्न झाले आहे. गावातील सर्व व्यवहार बंद होते. गावात कुणाच्याही घरी रविवारी चूल पेटली नाही. निसर्गाच्या कुशीतील मादळे गाव शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर, दिडेक डजार लोकवस्ती असलेल्या येथील गावातील लोकांचा तसा शहराशी जास्त संपर्क नाही. आहे त्यामध्ये समाधान मानणारे येथील लोक. कांहीजणांची डोंगरदऱ्यातील कांही गुंठ्यातील शेती सोडली तर जादातर मोलमजुरी करून जगणारे सर्व जण. राजकीय गट तट सोडले तर कोणताही सण असो किंवा कार्यक्रम गावच्या रितीरिवाजाप्रमाणे एकत्रित येण्याची येथील परंपरा. या गावातील बाजीराव बीडकर यांच्या मामांचे शुक्रवारी निधन झाले होते. रविवारी रक्षाविसर्जन होते म्हणून घरचीच कांही महिन्यापुर्वी नवी घेतलेली महिंद्रा मालवाहू गाडी घेऊन बीडकर, पोवार, चौगुले, कोपार्डे कुटुंबातील लोक रक्षाविसर्जनसाठी सकाळी इचलकरंजीला गेले होते. रक्षाविसर्जन आटोपून ते मादळ्याला परत येताना दुपारी तीन वाजता अपघात झाला. टेम्पो उलटून त्यांच्यावरच काळाने घाला घातला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कोण जखमी, कोण ठार झाले हेच समजेना, अपघाताची बातमी गावाकडे आली आणि गावात पळापळ सुरू झाली. गावातून शहराकडे येण्यासाठी कोणतीही बस, एसटी, साधे वडाप सुद्धा नाही, मिळेल त्या वाहनाने सादळे आणि मादळे गावातील लोक कोल्हापूरला आले. दुपारी तीन वाजल्यापासून रस्त्यावर दोन्ही गावांतील लोक, पाहुणे, मित्र, नातेवाईक, राजकीय लोकांची गर्दी झाली होती. गावात सर्वच लोकांच्या नजरा रस्त्याकडे लागल्या होत्या. रस्त्यावर गाडी आली की सर्व लोक धावत जाऊन चौकशी करीत होते. एखादा फोन जरी वाजला तरी आणखी काय अपघाताची जादा माहिती समजते का यासाठी सर्वांचे कान फोनकडे लागलेले होते. गावातील, महिला आणि पुरुष मंडळी मारुती मंदिरासमोर गटागटाने बसलेले होते. याच गावावरून जोतिबाला जावे लागते. रविवार असल्याने रस्त्यावर भाविकांची गर्र्दी होती. येणारे जाणारे भाविक गर्र्दी पाहून काय घडले आहे, विचारत होते आणि हळहळ व्यक्त करीत होते. जे या अपघातात ठार झाले आहेत त्यांच्या घरात सन्नाटा पसरला होता. तर बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची गर्र्दी झाली होती. अपघात कसा झाला, एकूण किती मृत झाले. जखमी किती आहेत. जखमींवर कुठे उपचार सुरू आहेत. याची मोठी चर्चा सुरू होती. या अपघातात सापडलेल्यांच्या घरातील लोकांची घालमेल झाली होती. (वार्ताहर) मार्गावर वाहतूक ठप्प माले फाट्यावरील या अपघातामुळे कोल्हापूर-सांगली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यातून वाट काढत हातकणंगले पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक भालके आपल्या पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले व त्यांनी बघ्यांना हटवले. बेकायदेशीर वाहतुकीला आळा कधी ? माले फाटा अपघातामधील मालवाहू पिकअप व्हॅनमधून २७ व्यक्ती प्रवास करीत होते. त्याला प्रवासी वाहतूक करता येते का ? प्रवाशांची मर्यादा किती? याबाबत आरटीओ कार्यालयाचे काय नियम आहेत? प्रादेशिक परिवहन विभाग अशा वाहतुकीबाबत कोणती कारवाई करणार, याबाबत अपघातस्थळी चर्चा सुरू होती.
मादळेत भीतीचे काहूर; चुली पेटल्याच नाहीत !
By admin | Updated: July 4, 2016 00:46 IST