कोल्हापूर : पावसाने हुलकावणी दिली असली तरी तूर्त शहरवासीयांना घाबरण्याचे कारण नाही. सर्वांना पुरेसा असा पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, तो नियमित दाबाने न होता कमी दाबाने होईल. लवकर पाऊस न लागल्यास पहिल्या टप्प्यात किमान २० टक्के पाणी कपातीची शक्यता आहे. शहरवासीयांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जलअभियंता मनीष पोवार यांनी केले आहे. राधानगरी धरणाच्या साथीने बारा महिने अखंड वाहणारी पंचगंगा उशाला असल्याने कोल्हापूरकरांना कधी पाण्याची टंचाई माहितीच नाही. मात्र, जुलै उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस लांबल्याने पाण्याचा वापर काटकसरीने न केल्यास भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना कोल्हापूरकरांना करावा लागण्याची शक्यता आहे. राधानगरी धरण मृतसाठ्याच्या जवळ पोहोचल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग अत्यंत कमी प्रमाणात सुरू आहे. राधानगरी धरणापासून भोगावती, कुंभी, कासारी, आदी नद्यांच्या दुतफर् ा शेती आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू आहे. परिणामी, पुईखडी व कसबा बावडा जलशुद्धिकरण केंद्रातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शहरवासीयांना सध्या कमी दाबाने पाणी मिळणार असल्याने घाबरण्याचे कारण नाही. मात्र, पावसाने अशीच हुलकावणी दिल्यास टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्यात येईल. अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.