कोल्हापूर : विद्यार्थी व पालकांच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन काही संस्थाचालक लाखो रुपये डोनेशन रूपाने गोळा करीत आहेत. अशा संस्थाचालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी हत्तीमहल रोडवरील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. याबाबत सोमवारी (दि. १५) संस्थाचालकांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन उपशिक्षणाधिकारी ए. आर. पोतदार यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना दिले. शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के प्रवेश मोफत देणे बंधनकारक असतानाही काही शिक्षण संस्था नियमांची पायमल्ली करीत आहेत. शाळेत पालकांची मुलाखत घेऊ नये. विनाअनुदानित तुकडीची अन्यायी फी विद्यार्थ्यांवर लादणाऱ्यांची चौकशी करावी. विद्यार्थ्यांकडून घेतले जाणारे शुल्क, फी यांच्या पावत्या विद्यार्थ्यांना द्याव्यात. प्रवेशासाठी ८५ टक्के ड्रॉ, तर १५ टक्के व्यवस्थापन कोटा असावा. महाविद्यालयात रॅगिंग विरोधात ठोस पावले उचलावीत, आदी मागण्या केल्या. यावेळी उपशिक्षणाधिकारी ए. आर. पोतदार यांनी याबाबत शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांच्याशी चर्चा करून सोमवारी बैठक बोलावू, असे सांगितले. यावेळी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष चेतन शिंदे, शिवसेना शहराध्यक्ष शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, पद्माकर कापसे, सुनील जाधव, माजी जिल्हाध्यक्ष विजय कुलकर्णी, किशोर घाटगे, महिला आघाडीच्या पूजा भोर, रूपाली कांबळे, रणजित जाधव, राजू भोई, विशाल देवकुळे, राजू जाधव, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी) डोनेशनचा भस्मासूर या आंदोलकांनी शिक्षणसम्राट यांच्या वेशभूषा परिधान केलेला भस्मासूर आणला होता. हा शिक्षण सम्राटरूपी राक्षस सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी ‘विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘शिक्षणसम्राटांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देण्यात आल्या.
शिक्षण संस्थाचालकांच्या लुटीला आवर घाला
By admin | Updated: June 12, 2015 00:54 IST