कोल्हापूर : पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडाला असल्याने केंद्रातील भाजप सरकारविरोधात सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मग त्यात कोल्हापूरकर मागे कसे राहतील? कोल्हापुरातील एका पेट्रोल पंपावर चक्क निऑन साईन बोर्डवर ‘पेट्रोलचे दर आपल्या जबाबदारीवर वाचावेत. छातीत कळ आल्यास आम्ही जबाबदार नाही. - पंपमालक संघटना’ असे जाहीर करून टाकले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
कोल्हापूरजवळच्या सांगली फाट्यावरील एका पंपावर हा फलक लावला होता; परंतु प्रत्यक्षात जे घडले ते वेगळेच आहे. या पंपावरील रोजचे दर या फलकावर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी एका कर्मचाऱ्याकडे आहे. तो दराशिवाय दिवाळीच्या व अन्य शुभेच्छाही हौसेने या फलकावर देत असतो. त्याने गमतीने गुुरुवारी सकाळी काही वेळ हा मेसेज त्या फलकावर वापरला; परंतु नंतर त्याचे गांभीर्य लक्षात आल्यावर तो मेसेज बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचा व्हिडीओ मात्र सगळीकडे जोरदार व्हायरल झाला आणि कोल्हापूरकरांच्या अनोख्या निषेध पद्धतीची चर्चा नव्याने रंगली. सध्याचे पेट्रोलचे दर पाहता सर्वसामान्य माणसाच्या छातीत कळ येण्यासारखीच स्थिती असल्याची प्रतिक्रिया लोकांतून उमटली. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनातीलच भावना पंपचालकांनी मांडल्याची भावना व्यक्त झाली.
फोटो : १८०२२०२१-कोल-पेट्रोल पंप