लॉकडाऊननंतर सात ते अकरापर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी मिळताच लोकांनी बांबवडे येथे तोबा गर्दी करण्यास सुरुवात केली. बांबवडे येथे शाहूवाडी, पन्हाळा व शिराळा तालुक्यांतील शंभराच्यावर गावांचा दररोज संपर्क येतो. त्यामुळे येथे नेहमी गर्दी होते. हे लोक वाहने बसस्थानक परिसरात अस्ताव्यस्त उभी करतात. काही व्यापारी रस्त्यावरच मालवाहतूक वाहने उभी करून माल उतरवून घेत असतात. या कारणामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते.
लॉकडाऊनची शिथिलता का केली आहे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. शाहूवाडी तालुक्यात कोरोना रुग्णांचा आलेख दररोज चढता आहे. मृत्यूदरही म्हणावा तितका कमी येत नाही, याचे गांभीर्य लोकांना कळत नाही. लोक विनाकारण गर्दी करत आहेत. काही युवक बसस्थानक परिसरात तळ ठोकून असतात. त्यांच्यावर नियंत्रण नाही. विनाकारण दुचाकीचा फेरफटका मारण्यास येत असतात. युवकांबरोबर परिसरातील काही लोकसुद्धा सकाळी धारा, जनावरांची चारापाणी व्यवस्था करून बांबवडे येथे फेरफटका मारण्यासाठी हमखास येतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. हे लोक पिशवी रस्त्यावर जथ्थे करून बसलेले असतात.
व्यापारी, किरकोळ व्यावसायिक, भाजी मंडई यांच्याकडून कोरोनाचे नियम सहसा पाळले जात नाहीत. अपवाद वगळता सर्व ठिकाणी लोकांनी गर्दी केलेली दिसते. सुरक्षित अंतर ठेवून, तोंडाला मास्क लावून खरेदी करणारे लोक फार कमी प्रमाणात आहेत. याला व्यापाऱ्यांनी शिस्त लावणे गरजेचे आहे.