जनावरांच्या खरेदी विक्री बरोबर अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कोपार्डे (ता. करवीर) येथील जिल्ह्यातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार कोरोनातील लॉकडाऊनमुळे गेले सहा महिने बंद होता. गेल्या आठवड्यात शनिवारी तो पुन्हा सुरू झाला, पण जनावरेच विक्रीसाठी कमी आली होती. पण आज हा बाजार जनावरे, भाजीपाला, शेती औजारे, फळविक्रेते व कपडे विक्रेत्यांनी हजेरी लावल्याने पुन्हा गजबजला.
जातिवंत म्हैस, गाय, बैल यासाठी पश्चिम महाराष्ट्रात कोपार्डे जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. येथे मिरज, कराड, सांगली, बेळगाव, सांगोला, वैभववाडी या ठिकाणांहून जातिवंत जनावरे विक्रीसाठी येत असतात. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी जनावरे खरेदी-विक्रीसाठी येथे येत असतात. दर शनिवारी भरणारा हा जनावरांचा बाजार अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांबरोबर शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीचे केंद्र बनले आहे.
आज मात्र शेतकरी व व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी केली होती. जवळपास ४५० ते ५०० म्हैशी, गायी, बैल आज बाजारात दाखल झाले होते. जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात झाले. आज बाजारात ३५ ते ४० लाखांच्या जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याने शेतकरी व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात होते. म्हैस व गाय जाती व वयानुसार ५० ते १ लाख रुपयांपर्यंत दर होते.
प्रतिक्रिया
सहा-सात महिने कोरोनामुळे जनावरांचा बाजार बंद होता. अनेक शेतकऱ्यांना आपल्या पसंतीचे व दरात परवडणारी जनावरे खरेदी करण्यासाठी गावोगावी जावे लागत होते, पण आता बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांची सोय होणार आहे.
सरदार पाटील (कर्मचारी)
अनेक दिवस दुधाळ व जातिवंत जनावरांच्या खरेदीसाठी गावोगावी फिरत होतो. पण आज कोपार्डे जनावरांच्या बाजारात विविध जातींची व किफायतशीर किमतीत म्हैस खरेदी केली आहे.
बाजीराव दळवी (कणेरी, ता. पन्हाळा)
फोटो आहे.
250921\20210925_121524.heic
कोपार्डे जनावरांच्या बाजारात आज जातिवंत जनावरांच्या बरोबर छोट्या मोठ्या व्यावसायिकांना गर्दी केली होती