कोल्हापूर : कोल्हापूर शहराची तहान भागविणाऱ्या ४८९ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी काळम्मावाडी धरणातून शहराला थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम राधानगरी रस्त्यावरील पुईखडी येथील जलशुद्धिकरण केंद्राजवळ होणार आहे.एका चांगल्या योजनेचे भूमिपूजन होत असताना मुख्यमंत्र्यांचे स्वागत मात्र ‘कोल्हापूर बंद’ने होत आहे. कोल्हापूर शहरात गेली चार वर्षे टोल नको म्हणून आंदोलन सुरू आहे. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी टोलविरोधी कृती समितीशी अनेकवेळा चर्चा केली आहे. परंतु, समितीची भूमिका टोल देणारच नाही, अशी आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका मात्र पर्याय द्या, मार्ग काढतो, अशी आहे. ‘टोल नकोच’ या भूमिकेस त्यांचा विरोध आहे. त्यामुळे या प्रश्नातून तोडगा निघालेला नाही. त्याचा राग म्हणून कृती समितीने बंदची हाक दिली आहे.बंदमध्ये शिवसेना-भाजपसह विविध संस्था-संघटना सहभागी होणार आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे त्यास राजकीय रंगही आला आहे. मंत्र्यांवरील शाईफेक आंदोलनामुळे बंद शांततेत व्हावा, असा प्रशासनावरही ताण आहे.भूमिपूजन झाल्यानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने निर्माण चौकात ‘वचनपूर्ती’ मेळावा होत आहे. ही योजना नाही झाली, तर आपण निवडणुकीस उभे राहणार नाही, अशी घोषणा त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत केली होती. त्यामुळे त्यांनीच ‘वचनपूर्ती’ मेळाव्याचे आयोजन केले आहे. तो झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री रात्री कोल्हापुरात मुक्कामास असून, बुधवारी सकाळी साडेसात वाजता दोघेही विमानाने मुंबईस रवाना होणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
थेट पाईपलाईनचे आज भूमीपूजन
By admin | Updated: August 26, 2014 00:28 IST