कोल्हापूर : महाविद्यालयीन विद्यापीठ प्रतिनिधींच्या निवडीनंतर आता शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाची अध्यक्ष, सचिव पदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातील पहिला टप्पा असलेल्या विद्यापीठ विद्यार्थी मंडळाची प्रतिनिधींची यादी शनिवारी (दि. ३०) जाहीर झाली. यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण १५ विद्यापीठ प्रतिनिधींचा समावेश आहे.विद्यापीठ कल्याण मंडळाने विद्यापीठ कायदा १९९४ नुसार गुणवत्तेच्या आधारावर निवड झालेल्या १५ विद्यापीठ प्रतिनिधींची यादी जाहीर केली. यामध्ये एससी, एसटी अथवा एनटी, ओबीसीमधील प्रत्येकी एक आणि महिला प्रतिनिधीचा समावेश आहे. विद्यापीठस्तरीय विद्यार्थी मंडळातील जिल्हानिहाय प्रतिनिधी असे : कोल्हापूर : विवेक कोकरे (राजाराम कॉलेज), पंकज मोरे (शहाजी कॉलेज), अमितकुमार नलवडे (न्यू कॉलेज), श्वेता परुळेकर (नाईट कॉलेज कोल्हापूर), स्नेहा परीट (अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, हातकणंगले). सांगली : शुभम जाधव (गणपतराव आरवाडे कॉलेज आॅफ कॉमर्स), मीनल बडवे (कस्तुरबाई वालचंद कॉलेज), दिनेश शेलार (चिंतामणराव इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड रिसर्च), सूरज मोरे (देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्टस अँड सायन्स कॉलेज, चिखली), अमर कांबळे (पुतळाबेन शहा कॉलेज आॅफ एज्युकेशन). सातारा : तृप्ती आतकेकर (यशवंतराव चव्हाण कॉलेज आॅफ सायन्स, कऱ्हाड), कमलेश साळुंखे (आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे), अश्विनी चव्हाण (महिला महाविद्यालय, कराड), वैभव आडाव (आ. शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा), संतोष जाधव (दहीवडी कॉलेज).अधिसभा निवडणुकीसाठी २० हजार जणांची नोंदणीशिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी पदवीधर नोंदणीची अंतिम मुदत आज, रविवारी संपली. या मुदतीअखेर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे २० हजार पदवीधरांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. अधिसभा निवडणूक २०१५ मध्ये होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पदवीधर नोंदणीची प्रक्रिया सुरू केली. अधिसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागासाठी पदवीधरांना नोंदणी करणे आवश्यक होते. त्यासाठी विद्यापीठ नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. आज अखेरच्या मुदतीपर्यंत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुमारे २० हजार जणांनी नोंदणी केली आहे. पदवीधर नोंदणीचे अर्ज एकत्रित करून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी चार ते पाच महिने लागतील. संबंधित यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि प्रतीत उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, आज सुटी असूनदेखील पदवीधर नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी प्रकाशन विभाग, कॅश विभाग, आवक-जावक विभाग आणि सभा विभाग कार्यालयीन वेळेत सुरू होते.पुढील प्रक्रिया अशी...विद्यापीठस्तरीय विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्ष, सचिवपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत : १० सप्टेंबर अर्जांची छाननी : ११ सप्टेंबर अर्ज माघारीची मुदत : १५ सप्टेंबरअध्यक्ष, सचिव पदांसाठीची निवडणूक : २० सप्टेंबर
विद्यापीठस्तरीय विद्यार्थी मंडळाची यादी जाहीर
By admin | Updated: August 31, 2014 23:36 IST