लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह अधुनमधून पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दिवसभर निरुत्साही वातावरण राहिले. आज, मंगळवारीही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वातावरणामुळे भाजीपाला, गुऱ्हाळघरे, वीटभट्ट्यांचे नुकसान झाले आहे.
गेले दोन दिवस अचानक थंडी गायब झाली. त्यानंतर रविवारी रात्रीपासून काहीसे ढगाळ वातावरण दिसू लागले. सोमवारी सकाळी आकाश ढगाळच राहिल्याने थंडीऐवजी उष्मा जाणवत होता. सकाळी आठ वाजता जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. त्यानंतर अधुनमधून दिवसभर पावसाच्या सरी पडत राहिल्या. सोमवारी किमान तापमान १९, तर कमाल २९ डिग्री राहिले.
या वातावरणाचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याला बसला. ढगाळ वातावरणामुळे वांगी, काकडी, दोडक्यासह इतर फळभाज्यांना किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कलिंगड हंगाम सुरू झाला आहे, त्यात अशा वातावरणामुळे त्यालाही फटका बसणार आहे. वीटभट्ट्या, गुऱ्हाळघरांचेही नुकसान झाले आहे. अचानक पाऊस आल्याने विटा व गुऱ्हाळघरांचे जळण झाकण्यासाठी तारांबळ उडाल्याचे दिसले.
आणखी दोन दिवस ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिवसभर निरुत्साही वातावरण राहिल्याने दैनंदिन कामकाजावरही काहीसा परिणाम झाला.
हवामानाचा अंदाज...
वार किमान तापमान कमाल तापमान हवामान
मंगळवार १९ २९ ढगाळ, हलका पाऊस
बुधवार २० ३० ढगाळ, काही ठिकाणी तुरळक पाऊस
गुरुवार १९ २९ ढगाळ
फोटो ओळी :
सोमवार पासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने गुऱ्हाळमालकांची चांगलीच तारांबळ उडाली. गुऱ्हाळघराचे जळण एकत्रित करून ते झाकताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. (फाेटो-०४०१२०२१-कोल-रेन, रेन०१ व रेन०२) (छाया- आदित्य वेल्हाळ)