सेनापती कापशी : जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांमुळेच चिकोत्रा खोऱ्याला चार एकरांच्या अन्यायी स्लॅबमधून मुक्ती मिळाली. या खोऱ्यात आठ एकरांचा नवा स्लॅब मंजूर झाला. जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या या वचनपूर्तीबद्दल शेतकऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार झाला. सेनापती कापशी (ता. कागल) येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे आर. डी. चौगुले होते.मुश्रीफ म्हणाले, नव्या आठ एकराच्या स्लॅब मंजुरीचे श्रेय लाटण्यासाठी विरोधकांची केविलवाणी धडपड सुरू आहे. २० वर्षांपूर्वी हा चार एकरांचा अन्यायी स्लॅब लागू केला होता. या खोऱ्यातील शेतकऱ्यांवर विरोधक दाखवीत असलेले प्रेम पुतनामावशीच्या प्रेमासारखे आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या माध्यमातून माद्याळसह, वडरगे, बहिरेवाडी या गावांसाठी हिरण्यकेशी नदीवरून उपसा योजना उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चार एकरांच्या या जुन्या अन्यायी स्लॅबनुसार आलाबाद आणि गलगले गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्या आठ एकरांच्या नव्या स्लॅबनुसार कार्यवाही होऊन परतून शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पंचायत समितीचे सदस्य शशिकांत खोत यांनी मार्गदर्शन केले. उदयसिंह घोरपडे, प्रकाश कुलकर्णी, सुनील पाटील, भाऊसाहेब पाटील यांची भाषणे झाली. सरपंच सीमा नायकवडी, दादाराजे निंबाळकर-निपाणीकर, शामराव लुगडे, अंकुश पाटील, महादेव पाटील, डी. पी. पाटील, आत्माराम पोवार, जे. डी. मुसळे, नेताजीराव मोरे, सौरभ नाईक, बाळासाहेब पाटील, सतीश जाधव, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
मुश्रीफ यांच्यामुळेच अन्यायी ‘स्लॅब’मधून मुक्ती
By admin | Updated: September 10, 2014 00:30 IST