लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या पश्चिम भागात मंगळवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी बारा तासांत तीन फूट चार इंचाने वाढली. कोल्हापूर शहर परिसरातही मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरू असल्याने जनजीवन काहीचे विस्कळित झाले.
संततधार पावसामुळे शहरवासीयांचे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचून राहिल्यामुळे वाहतूकही संथ गतीने सुरू होती. विशेष म्हणजे बुधवारी ईदची सुट्टी होती, शिवाय बाहेर असल्याने अनेकांनी घरात बसून राहणेच अधिक पसंत केले. संततधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचून राहिले. गटारी, भूमिगत गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. शहरातील जयंती, दुधाळी, गोमती, शाम हौसिंग सोसायटी नाल्यांसह लहानमोठे नाले काठोकाठ भरून वाहताना दिसले.
जिल्हा प्रशासनामार्फत पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी शहरातील राजाराम बंधारा येथे मोजली जाते. सकाळी सहा वाजता पंचगंगेची पातळी २८ फूट १० इंच होती. ती सायंकाळी सहा वाजता ३२ फूट २ इंच इतकी होती. बारा तासांत या पातळीत ३ फूट ४ इंचाने वाढ झाली. पश्चिम भागात जोराचा पाऊस असल्याने पातळी हळूहळू वाढत आहे. नदीची पातळी ३९ फुटांवर गेली की सावधानतेचा इशारा देण्यात येतो, तर ४३ फुटांवर गेली की धोक्याचा इशारा दिला जातो. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर दोन दिवसांत पंचगंगा किमान इशारा पातळी गाठेल, असा अंदाज आहे.
- पाऊस, वारा अन् गारठा -
शहरात जोराचा वारा, संततधार पाऊस असून हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. गडद ढगांमुळे वातावरणात काळोख आहे. शहरातील रंकाळा व कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून त्याचे पाणी सांडव्यावरून वाहत आहे.