दूध उत्पादक सभासदांबरोबरच गोकुळ दूध संघाच्या कार्यकाळात आपण अध्यक्ष म्हणून निर्णय घेताना संस्था व सभासदांचे हित जोपासले होते.
मात्र, सत्ताधारीमधील नेत्यांना दूध उत्पादक सभासदाचे हित जोपासणे हे त्यांना नको होते.
त्यामुळे गतवेळच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत त्यांनी माझा पराभव केला. मात्र, काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी परिवर्तन पॅनेल विजयी करून सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून देऊ, असा इशारा गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव माने-पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.
गोकुळ दूध संघामध्ये पदाच्या काळात आपण चांगले काम केल्यामुळे सत्ताधारीमधील नेत्यांना मी डोईजड होईल, अशी भीती होती असा आरोप करत पाटील म्हणाले,पंधरा वर्षे गोकुळ दूध संघाचा काम पाहिले आहे. गोकुळच्या इतिहासात नोंद होईल अशी तीन वेळा दूध दरवाढ केली आहे. शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे २८ कोटी रुपयांचा सॅटेलाईट दूध डेअरी प्रकल्प कार्यन्वित केला आहे. गोकुळ दूध संघाला २५ कोटी अनुदान मिळवून दिले. शिरोळ तालुक्यात १३४ दूध उत्पादक सभासद आहेत, हातकणंगलेमध्ये ९५ सभासद आहेत. या दोन्ही तालुक्यांतील १५० सभासद परिवर्तन पॅनलच्या बाजूने ठाम राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाटील म्हणाले , पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितल्याने मी या निवडणुकीतून माघार घेतली पण माघार घेताना कोणतीही अट किंवा पदाचे आश्वासन घेतलेले नाही. गेली चार वर्षे पालकमंत्री सतेज पाटील यांचे नेतृत्व मानून काँग्रेस पक्षासाठी मी कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.