कोल्हापूर : नागरिकांनो घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढत आहोत, संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभार गल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शाहूपुरी कुंभार गल्लीतील पूरग्रस्तांना दिले.
यावेळी शाहूपुरी कुंभार गल्लीतील पूजा नाईकनवरे यांनी या पुराच्या परिस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिल्याचे सांगितले. गणेश पाटील यांनी २००५ व २०१९ पेक्षाही २०२१ ला आलेला पूर भयंकर आहे. तरी शासनाने आम्हाला भरीव मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. याठिकाणी आजी-माजी मुख्यमंत्री एकाचवेळी एकत्र आल्याने गोंधळ उडाला. मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, त्यांचे सुरक्षारक्षक, माध्यमांचे प्रतिनिधी आणि मोठा पोलीस बंदोबस्त यामुळे नागरिकांना मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना आपल्या अडचणीच सांगता आल्या नाहीत. मुख्यमंत्री येथे जवळपास १५ मिनिटे होते; पण पूरग्रस्तांना त्यांना भेटता आले नाही. त्यामुळे काही नागरिकांनी वाहनांच्या ताफ्यासमोर जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी अडविले, भेट न झाल्याने परिसरातील नागरिकांनी असंतोष व्यक्त केला.
---
फोटो नं ३००७२०२१-कोल-मुख्यमंत्री शाहुपूरी भेट०१,०२
ओळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला.
---