कागल : कागल शहरातील एकही व्यक्ती बेघर राहता कामा नये, यासाठी आपण एक हजार एक घरांची घरकुल योजना आणली. रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना यातूनही शेकडो घरे उभी राहिली आहेत. कागलमध्ये राहणाऱ्याच म्हाडाच्या सदनिका देणार आहोत. घरकुलाच्याही अपूर्ण सदनिका बांधणार आहोत. येत्या दसऱ्याचे सोने वाटप या नव्या घरकुलांमध्ये करू़, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल नगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या घरकुल प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्यातील २५२ घरांचे वाटप नुकतेच करण्यात आले. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर यातील रहिवाशांनी गृहप्रवेशाचा कार्यक्रम मंत्री मुश्रीफ यांच्याहस्ते ठेवला होता, तेव्हा ते बोलत होते.
नगराध्यक्षा माणिक माळी, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, प्रकाश गाडेकर मुख्याधिकारी पंडित पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते. ज्यांना घरे मिळाली त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवून मोठे करावे. ज्या पात्र लाभार्थींना मिळाली नाहीत, त्यांना दसऱ्यापर्यंत देऊ.
स्वागत व प्रास्ताविक प्रवीण काळबर यांनी केले. भैया माने, रमेश माळी, प्रकाश गाडेकर यांचीही भाषणे झाली. परवडत नसल्याने बहुतांशी पालिकांनी ही योजना सोडून दिली. योजना पूर्ण करणारी कागल नगरपालिका एकमेव आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
आभार सौरभ पाटील यांनी मानले.
पुरणपोळी... पुष्पवृष्टी... आनंदाश्रू ...
घरकुले मिळालेल्यांनी आज गॅलरीत उभे राहून मंत्री मुश्रीफ यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तसेच त्यांना पुरणपोळीचे जेवणही वाढले. मोफत सदनिका लाभलेले लाभार्थी मुश्रीफांना आपले घर दाखवून, घराला पाय लावावा, असा आग्रह करीत होते. घराची स्वप्नपूर्ती पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे होते. या स्वागताने मुश्रीफही भावूक बनले होते.
फोटो कॅपशन
कागल येथील घरकुल योजनेत सदनिका मिळालेल्या कुटुंबाने मंत्री मुश्रीफ यांच्याहस्ते गुढी उभारली. यावेळी भैया माने, प्रवीण काळबर, नगराध्यक्षा माणिक माळी आदी मान्यवर उपस्थित होते.