कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील एव्हीएच प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. एव्हीएच प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे मानवी आरोग्य आणि निसर्गावर विपरीत परिणाम होणार आहे, याकडे खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष वेधल्यानंतर केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे समिती नेमून येत्या १५ दिवसांत अहवाल घेतला जाईल. पर्यावरण व मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला असल्यास एव्हीएच बंद करू, असे आश्वासन दिले.केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्लीत नुकतीच भेट घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांवर चर्चा केली. डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी चंदगड तालुक्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधले. खासदार सुप्रिया सुळे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटीलही उपस्थित होते. आजरा, चंदगड तालुक्यांत हत्तींचा उपद्रव वाढतो आहे. जीवित, वित्तहानी होत आहे. शहरातील रंकाळा शुद्धिकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भरीव निधी द्यावा, कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढवा, जयंती नाल्याच्या शुद्धिकरणासाठी भरीव निधी द्यावा, बैलगाडी शर्यतीला परवागी द्यावी, अशी मागणीही महाडिक यांनी केली. यावर जावडेकर म्हणाले, विशेष संरक्षित क्षेत्र तयार करून हत्तींना स्थलांतरित केले जाईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देऊ. बैलगाडी शर्यतीसंबंधी एक महिन्यात निर्णय घेऊ. नागपंचमीसाठी सुब्रह्मण्यम समितीचा अहवालही गृहित धरला जाईल. (प्रतिनिधी)
तर एव्हीएच प्रकल्प बंद करू
By admin | Updated: November 28, 2014 23:54 IST