कोल्हापूर : ‘गोकुळ’ आणि राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने माजी मंत्री सतेज पाटील हे आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. ‘गोकुळ’मध्ये दरोडा घातला म्हणणाऱ्यांनी ‘आयआरबी’कडून आणि थेट पाईपलाईनमध्ये किती ढपला पाडला, याचा हिशेब आधी द्यावा, नाही तर कोणी, कोठे आणि किती ढपला पाडला याचा हिशेब करण्यासाठी एका व्यासपीठावर यावे, असे आव्हान राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील यांनी सतेज पाटील यांना दिले आहे. शिये (ता. करवीर) येथे आयोजित राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शिये तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सर्जेराव काशीद अध्यक्षस्थानी होते.पाटील म्हणाले, अजिंक्यताराची जागा कोणाची? ड्रिमवर्ल्डची जागा कशापद्धतीने मिळविली याची माहिती माजी मंत्र्यांनी जनतेला द्यावी. ज्यांनी सत्तेचा गैरवापर करत कोल्हापुरातील महत्त्वाच्या जागा हडप केल्या, ढपला पाडून निकृष्ट दर्जाचे रस्ते शहरवासीयांच्या माथी मारले, त्यांनी आमदार महाडिक यांच्यावर टीका करताना नीतिमत्ता तपासावी.आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, जिल्हा दूध संघात १५० कोटींचा भ्रष्टाचार झाला असे सांगणारे नेते हे व्यक्ती द्वेषातून सहकार मोडीत काढत आहेत. ज्यांना नफ्याच्या विभागणीचे सूत्र माहीत नाही, अशा लोकांचा जनतेमध्ये गैरसमज पसरून आपले साधून घेण्याचा डाव सभासद कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत.यावेळी अभिजित पाटील, सुरेश पाटील, दत्ता गाडवे, सर्जेराव माने, डॉ. एम. बी. किडगावकर, सर्जेराव काशीद, पांडुरंग पाटील, शिवाजी गाडवे यांची भाषणे झाली. याप्रसंगी सत्तारूढ गटाच्या उमेदवार कल्पना किडगावकर, यशवंत जाधव, सरपंच लक्ष्मी फडतारे, कुमार जाधव, मनोहर पाटील उपस्थित होते. बाळकृष्ण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. जयसिंग पाटील यांनी आभार मानले.
‘ढपल्या’चा हिशेब एका व्यासपीठावर करू
By admin | Updated: April 11, 2015 00:08 IST