संदीप आडनाईक -कोल्हापूर -पन्हाळगड या निसर्गनिर्मित किल्ल्याला पौराणिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचा वारसा आहे. गिरिस्थान म्हणून विशेष दर्जा मिळालेले हे गिरीदुर्ग भारत सरकारने २ जानेवारी १९५४ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. मात्र, पडझड झालेले बुरुज, ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष, पर्यटक वाढीच्या योजनांची कमतरता, पुरेशा सोयी-सुविधांचा अभाव अशी सध्याची स्थिती आहे.येथे ग्रीन कव्हर वाढत असले, तरी पडझड झालेले बुरुज, ऐतिहासिक वास्तू दुरुस्त केल्यास दुर्गप्रेमींची तसेच पर्यटकांची संख्या वाढेल, हे नक्की. पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. याला पर्णालदुर्गही म्हणतात. करवीर राज्य स्थापनेच्या काळात मराठ्यांचीही काही काळ राजधानी असणाऱ्या या किल्ल्यावर शिवरायांचे त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक दिवस वास्तव्य होते. थंड हवेचे ठिकाण असलेल्या पन्हाळ्याचा गरिबांचे महाबळेश्वर असा लौकिक आहे. एकेकाळी जंगल असलेला हा परिसर मध्यंतरी उघडाबोडका झाला होता; परंतु आज हिरवाईचे लेणे लेवू लागला आहे. किल्ल्याची माहिती इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात मिळते. त्याची साक्ष पराशर मुनींची गुहा, पांडवदरा, पोहाळे येथील लेणी देत आहेत. नाग जमातीच्या वास्तव्यामुळे पन्नगालय (पन्नग = सर्प; आलय = घर) असेही म्हणतात. येथे राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, भोज, यादव या राजांनी राज्य केले व इ.स. १०५२ मध्ये आजचा किल्ला शिलाहारवंशी राजा भोज दुसरा याने बांधला. शिवरायांसह संभाजीराजे, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, रत्नाकरपंत दिवाण, कविवर्य मोरोपंत, शिवस्नुषा महाराणी ताराबाई, राजाराम महाराजांचे चिरंजीव दुसरे संभाजीराजे, त्यांच्या पत्नी जिजाबाई सरकार, रामचंद्र पंत अमात्य यांच्या जीवनाशी तसेच ऐतिहासिक वास्तूंशी पन्हाळा निगडित आहे. येथील चांगले रस्ते, स्वच्छता, गेल्या काही वर्षांत निर्माण झालेला ग्रीन कव्हर, वृक्षलागवड, शौचालयांच्या सोयी, येथील माध्यमिक शाळा, समृध्द ग्रंथालय, सरकारी कार्यालये व रुग्णालय, राष्ट्रीयीकृत बँक, आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज निवासस्थाने आणि आलिशान आहारगृहे स्वच्छता व टापटिपीसाठी ख्यातनाम आहेत. भेळीपासून पिझ्झापर्यंत खाद्यपदार्थांची उपलब्धता आहे. गूळ-काकवी, खरडा-भाकर, खमंग भरलेले वांगे हे येथील वैशिष्ट्य आहे. येथे १९५४ पासून नगरपालिका आहे. राज्य शासनाने गडाला गिरिस्थानाचा दर्जा दिल्यापासून शहरात गटारे, डांबरी रस्ते, विहिरी, बागबगीचे, निवासस्थाने, आदी सुधारणा झपाट्याने झाल्या. पन्हाळ्यावर चित्रपटनिर्माते, सिनेकलावंत, राजेरजवाडे यांचे टुमदार बंगले आहेत. येथील नयनमनोहर सृष्टिसौंदर्य व ऐतिहासिक वास्तूंचा भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांच्यासह अनेक निर्मात्यांनी चित्रपटांत उपयोग केला आहे. अलीकडेच अभिनेता नागेश भोसले यांनी तर थेट ‘पन्हाळा’ नावानेच चित्रपटाची निर्मिती केली आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय येथे आहे. मात्र काही वर्षांत दहा टक्केच काम विभागाने केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने काही योजना आखल्या तर पर्यटक व दुर्गप्रेमींची संख्या वाढू शकते.आठ लाखाहून अधिक पर्यटकपन्हाळा हा कोल्हापूरपासून अतिशय जवळ असल्यामुळे अनेक पर्यटक येथे येत असतात. पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार सहा लाख पर्यटकांनी गतवर्षी भेट दिली होती. यंदा नोव्हेंबरअखेर चार लाख पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे. अर्थात शैक्षणिक सहल, पुणे-कोल्हापूरातील दिवसा येवून रात्री परत जाणाऱ्या पर्यटकांची नोंद नगरपालिकेकडे नाही. असे दोन लाखाहून अधिक पर्यटक असल्याची माहिती नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी दिली. पन्हाळगडासाठी आठ कोटीची कामेमाजी पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि अजित पवार यांच्यामार्फत पन्हाळगडासाठी आठ कोटीची कामे मंजूर झाली आहेत. त्यातून रस्ते, वीज, वाहनतळ, शौचालये यासारखी कामे करण्यात आली आहेत. पाणी योजनेसारखी आणखीही काही कामे प्रस्तावित आहेत.रोजगाराभिमुख पर्यटन धोरण हवे, असे मत कोल्हापूर जिल्हा हॉटेलमालक संघटनेचे उपाध्यक्ष उज्वल नागेशकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते पन्हाळा हे हिरवाईने नटलेले निसर्गनिर्मित पर्यटनस्थळ आहे. ऐतिहासिक वारसा असल्याने येथे रोजगाराभिमुख उपक्रम राबविता येतील. त्यातून सरकारला महसूलही मिळेल. रोप वे, स्थानिक खाद्यपरंपरा (खरडा-भाकरी, भरलेले वांगे), उद्याने, ऐतिहासिक स्थळे विकसित करणे या माध्यमातून पर्यटन वाढू शकेल. हे व्हायला हवे...डेक्कन ओडिसीचा प्रवासी वर्ग पन्हाळ्यावर आणणेजोतिबा-पन्हाळा रोप वे ने जोडणेपन्हाळ्यावरील निसर्गसंपदा जतन करणेदुर्मिळ पक्ष्यांचे वास्तव्य जगासमोर आणणेपुरातत्व विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ, नगरपालिकेमार्फत पर्यटनाच्या योजना राबविणे
‘पन्हाळ्या’चा वारसा जपायला हवा
By admin | Updated: December 11, 2014 23:47 IST