कोल्हापूर : एक आठवड्यापूर्वी मुंबईत ऐतिहासिक वास्तू असलेल्या आंबेडकर भवनसह ‘बुद्धभूषण प्रेस’ पाडल्याच्या निषेधार्थ बुधवारी डाव्या लोकशाही बहुजन आघाडीतर्फे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दाभोळकर कॉर्नर चौक येथे रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांना पोलिसांनी अटक करून काही वेळाने त्यांची सुटका केली. आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. आंबेडकर भवन पाडल्याचे पडसाद राज्यभर उमटले असून सर्वत्र जनक्षोभ उमटला आहे. कोल्हापुरातही याचे पडसाद उमटले. डाव्या लोकशाही बहुजन आघाडीतर्फे दुपारी एकच्या सुमारास दाभोळकर कॉर्नर परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था काही काळ ठप्प झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटक करून काही वेळाने त्यांची सुटका केली.यावेळी ‘भाकप’चे सतीशचंद्र कांबळे म्हणाले, सरकारचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. २६ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शाहू जयंतीनिमित्त कोल्हापुरात आले होते. त्याच दिवशी शाहूंच्या समतेचा विचार पुढे नेणारे मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्यात आले. हा आंबेडकरी विचारांवरील हल्ला आहे.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट)चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख म्हणाले, माणसाने काय खायचे, काय घालायचे, हेच हे सरकार ठरवीत आहे. आता तर बाबासाहेबांच्या स्मृतीवरच त्यांच्या नावाची प्रेस पाडून हल्ला करण्यात आला आहे.‘भाकप’चे नामदेव गावडे म्हणाले, आपला ‘जय भीम,’ ‘लाल सलाम’ हा नारा देऊन दलित आणि श्रमिक चळवळीत एकत्र झाले पाहिजे. जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे महासचिव शिवाजीराव परुळेकर म्हणाले, सायंकाळनंतर कोणतीही वास्तू पाडू नये, असे सरकारचे परिपत्रक आहे. असे असताना ते भवन का पाडले? हा प्रश्न आहे.रिपब्लिकन सेनेचे सखाराम कामत म्हणाले, या जातीयवादी सरकारला संविधान दिलेले मान्य नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून असे कृत्य सुुरू आहे.आंदोलनात चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, गिरीश फोंडे, सुभाष देसाई, प्रा. सुनीता अमृतसागर,आशा कुकडे, अॅड. रमेश कांबळे, अमोल माने, डी. एस. पाटील, प्रदीप कवाळे, दिलदार मुजावर, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ बुधवारी डाव्या लोकशाही बहुजन आघाडीतर्फे दाभोळकर कॉर्नर चौक येथे ‘रास्ता रोको’ करण्यात आला.
डाव्या लोकशाही आघाडीतर्फे ‘रास्ता रोको’
By admin | Updated: July 7, 2016 00:39 IST