कोल्हापूर : ‘शेकाप’चे दिवंगत नेते गणपतराव देशमुख आणि कोल्हापूर यांचे नाते खूप वेगळे आहे. डाव्या विचाराच्या प्रवासात त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यासह कोल्हापुरात झालेल्या कष्टकरी, श्रमजिवी लोकांच्या आंदोलनात ते अग्रभागी असायचे. सीमा लढ्याच्या आंदोलनात ते उभे राहिलेच त्याशिवाय विधिमंडळात सर्वात अधिक आक्रमकपणे त्यांनी सीमा बांधवांच्या भावना मांडल्या.
राजकारणात राहूनही अंगात राजकारण भिनू न दिलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे गणपतराव देशमुख होेते. आयुष्यभर डाव्या विचारांना सोबत घेत तत्त्वज्ञानाची लढाई अतिशय प्रभावीपणे लढले. कष्टकरी समाजाच्या परिवर्तनामधील मैलाचा दगड म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडे पाहिले जाते.
अन् ‘खानसामा’ला पैसे दिले...
काँग्रेस आघाडी सरकारमध्ये गणपतराव देशमुख हे पणनमंत्री होते. कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना शासकीय विश्रामगृहात त्यांना भेटण्यासाठी ‘शेकाप’सह इतर मंडळी आली होती. दौरा संपवून मुंबईकडे जाताना, त्यांनी तेथील खानसामाला रजिस्टर घेऊन बोलावले. त्यामध्ये जेवढे चहा-पाणी, जेवण झाले त्यांचे पैसे दिले. त्याचबरोबर माझ्या दौऱ्यांमुळे आणखी कोणी जेऊन गेले असेल तर तेही घे. मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांकडून याचे पैसे घ्यायचे नाहीत, असे सांगितले होते.
‘खावटी’ कर्ज माफ करणारे कृषीमंत्री
गणपतराव देशमुख यांचे आयुष्यच कष्टकऱ्यांच्या लढ्यासाठी गेले. ज्या ज्यावेळी सत्तेची संधी मिळाली, त्या त्यावेळी त्यांनी उठावदार काम केले. १९७८ ला ते कृषीमंत्री असताना विकास संस्थांच्या पातळीवर शेतकऱ्यांनी उचल केलेल्या १५३ कोटींचे खावटी कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
ज्येष्ठांच्या सत्कारासाठी कोल्हापुरात
गणपतराव देशमुख विविध आंदोलनांसाठी कोल्हापुरात येत होते. मात्र ३१ जानेवारी २०२० ला ‘शेकाप’च्यावतीने ७५ वर्षे निष्ठेने पक्षात असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार देशमुख यांच्याहस्ते होता. त्यासाठी ते शेवटचे कोल्हापुरात आले होते.
शेकापचा विचार व्यक्तीरूपाने त्यांच्यामध्ये होता. हा विचार कसा पध्दतीने अंमलात येतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुख होते. राजकारणात पदे मिळविण्यास विचार व तत्त्वज्ञान घाण ठेवून कधी काही केले नाही. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतही ते आले असते, मात्र तत्त्वज्ञान सोडून काही केले नाही, अशी माणसं फार कमी असतात. माझी वाटचाल त्यांच्या विचारानेच राहिली.
- संपतराव पवार (माजी आमदार)