गणपती कोळी - कुरुंदवाड -शिरोळ राजकीयदृष्ट्या सुज्ञ व क्रांतिकारी समजला जातो; मात्र ‘कोजिमाशि’ व ‘गोकुळ’च्या निवडणुकीत शिरोळ-हातकणंगले तालुक्यांतील सत्ताधारी व विरोधी उमेदवारांचा पराभव करण्यात दोन्ही तालुके पिछाडीवर राहिले आहेत. निर्णायक मतदार असतानाही एकमेकांचे पाय खाली खेचण्याच्या वृत्तीमुळे राजकारण अंगलट आले आहे. त्यामुळे या निकालावरून आता तरी पूर्वेकडील नेते, कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.शिरोळ तालुका सामाजिक, शैक्षणिकतेबरोबर राजकीयदृष्ट्या सुज्ञ व सक्षम ओळखला जातो. त्यामुळे निवडणुकीत कितीही जातीयवादी राजकारण झाले, धनशक्तीचा वापर झाला, तरी चांगल्या उमेदवाराला मतदान करून आपला स्वाभिमान राखला आहे. त्यामुळे तालुक्याचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. असे असतानाही ‘कोजिमाशि’ व ‘गोकुळ’ निवडणुकीतून जिल्ह्याच्या राजकारणात तालुका पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे.‘कोजिमाशि’ निवडणुकीत सत्ताधारी दादा लाड यांच्या विरोधात राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने काट्याची टक्कर दिली. या निवडणुकीत हातकणंगले व शिरोळ तालुक्यात निर्णायक मतदार असल्याने दोन्ही आघाडीने सक्षम उमेदवार दिले होते. यामध्ये हातकणंगलेतून सत्ताधारीकडून धोंडिराम बाबर (रुकडी), संगीता मांगलेकर (मजले), तर विरोधी आघाडीतून सुरेश कोळी (इचलकरंजी) उमेदवार होते. शिरोळमधून सत्ताधारीकडून गौतम पाटील (कोथळी), आनंदराव काटकर (सैनिक टाकळी), तर विरोधी गटातून राजगोंडा झुणके (शिरदवाड), अशोक पलंगे (हेरवाड) हे उमेदवार होते.एकमेकांचे पाय ओढण्यात माहीर असलेले नेते, कार्यकर्त्यांच्या वृत्तीने या उमेदवारांचा बळी गेला. सत्ताधारी गटातील काटकरांचा निसटता विजय वगळता दोन्ही तालुक्यांतील दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव झाला. याउलट कोल्हापूर, कागल, भुदरगड भागांतील नेते कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करीत शिरोळ-हातकणंगले तालुक्याची जागाही आपल्याकडेच खेचत धूर्त राजकीय खेळी केली आहे.नेतृत्वही संपुष्टातगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शिरोळ व हातकणंगले तालुक्यांना एक जागा देत सत्ताधाऱ्यांकडून दिलीप पाटील, तर विरोधी गटातून भीमगोंडा बोरगावे उमेदवार होते. दोन्ही तालुक्यांना मिळून एक उमेदवार असतानाही दोनही उमेदवारांचा पराभव करीत गोकुळमधील या तालुक्याचे नेतृत्वही संपुष्टात आले आहे.राज्याच्या, देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या या तालुक्यांना जिल्ह्याच्या राजकारणात अपयश आले आहे.आतातरी शहाणपण शिकणार का ?खुन्नशी वृत्तीतून एकमेकांचे पाय खेचण्याच्या कुरघोडीने राजकारण तालुक्याच्या अंगलट आले. त्यामुळे या निकालातून तालुक्यातील नेते, कार्यकर्ते आतातरी शहाणपण शिकणार का, असा प्रश्न सामान्य लोक करीत आहेत.
नेत्यांना कुरघोडीचे राजकारण अंगलट
By admin | Updated: May 6, 2015 00:17 IST