कोल्हापूर : हद्दवाढीसंबंधीचा अंतिम अहवाल शासनाकडे दोन दिवसांत पाठविण्यात येणार आहे. हद्दवाढीस विरोध असणाऱ्या लोकप्रतिनिधींची भूमिका आणि म्हणणे ऐकून घेऊन हा अहवाल पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अनेक वर्षांपासून शहराची हद्दवाढ झालेली नाही. सहा महिन्यांपूर्वी शासनाने हद्दवाढीला हिरवा कंदील दिला. त्यानंतर शहरालगतच्या ग्रामीण मतदारसंघाच्या आमदारांनी उघड विरोधाची भूमिका घेतली. याउलट महापालिका पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढीचे समर्थन केले. ‘विरोध आणि समर्थन’ यामुळे हद्दवाढीचा पेच निर्माण झाला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच हद्दवाढीला प्रखर विरोध केल्याने कोंडी निर्माण झाली. त्यातून मार्ग काढून हद्दवाढीसंबंधी अहवाल पाठविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यावर शासनाने टाकली आहे.विधान परिषद निवडणुकीतील आचारसंहितेमुळे अहवाल तयार करण्याला ‘ब्रेक’ लागला. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी महापौर अश्विनी रामाणे यांच्या उपस्थितीत शहरातील ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेतली. हद्दवाढीसंबंधी सकारात्मक अहवाल त्वरीत पाठवा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला. त्यामुळे जिल्हा व महापालिका प्रशासनाने अहवाल तयार केला. मात्र, विरोध करणाऱ्या आमदारांनी म्हणणे मांडणारे असल्याचे सांगितले. त्यामुळे डॉ. सैनी लोकप्रतिनिधींचे म्हणणे घेऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून अहवाल दोन दिवसांत शासनाकडे पाठविणार आहेत.
हद्दवाढ विरोधातील नेत्यांचेही म्हणणे घेणार
By admin | Updated: January 13, 2016 01:10 IST