कोल्हापूर : प्रत्येक कामात पैसे घेऊन चुकीच्या पद्धतीने प्रकल्पांना परवानगी दिली जाते. शाहूवाडीतील वारणा मिनरल्स बॉक्साईट प्रकल्पाबाबतही असा प्रकार घडला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेने कोल्हापुरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात सोमवारी ‘लक्ष्मीपूजा’ घालून उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांना धारेवर धरले. यावेळी त्यांना पूजेच्या थाळीतील पैसे भेट देण्यात आले. या संदर्भात लवकरच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन येथील अनागोंदी कारभाराबद्दल माहिती देणार असल्याचा इशाराही देण्यात आला.वारणा मिनरल्स, शाहूवाडी या बॉक्साईट प्रकल्पास देण्यात आलेला परवाना रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी उद्योग भवन येथील मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी कार्यालयात गेले. परंतु, पूर्वकल्पना देऊनही प्रादेशिक अधिकारी एन. एच. शिवांगी उपस्थित नसल्याने त्यांच्याऐवजी निवेदन स्वीकारायला आलेल्या उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांना पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. चर्चा सुरू असतानाच सोबत आणलेल्या भटजीला इशारा करताच त्यांनी पूजेचे साहित्य उपप्रादेशिक अधिकारी यांच्यासमोरील टेबलावर ठेवून मंत्रपाठ करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या आंदोलनाने अधिकाऱ्यांना काहीच समजेना. मंत्रपाठ सुरू असतानाच जिल्हाप्रमुख पवार व इतर पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती करीत या कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत. पूर्वकल्पना देऊनही तुमचे वरिष्ठ का थांबले नाहीत? इथे कोणता धंदा चालतो ते आम्हाला माहीत आहे. चुकीच्या पद्धतीने खाण प्रकल्पांना परवाने दिल्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या वरिष्ठांना बडतर्फ केले पाहिजे, असे आरोप करीत धारेवर धरले. तसेच खाणमालकांकडून पैसे घेण्यापेक्षा आम्हीच देतो, असे म्हणत पूजेच्या थाळीतील पैसेही त्यांना भेट देण्यात आले. (प्रतिनिधी)वारणा मिनरल्स या प्रकल्पाच्या ठिकाणी क्षेत्र अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. २६) पाहणी केली आहे. यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांना सात दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिवसेनेने केलेल्या मागणीनुसार प्रकल्पातील त्रुटी व प्रकल्पा संदर्भातील मागण्यांचा अहवाल सोमवारीच शासनाकडे पाठविला जाईल.- जयंत कदम, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळवारणा मिनरल्स बॉक्साईट प्रकल्पास दिलेला परवाना रद्द करावा. या प्रकल्पाचा त्वरित पंचनामा करावा. परवान्यातील व इतर अनुषंगिक सर्व कायद्यातील अटी व शर्ती, नियमांचे उल्लंघन झाले आहे, त्याबाबत त्वरित गुन्हा दाखल करावा. जिल्ह्यातील इतर प्रकल्प व बेकायदा उत्खनन यावर त्वरित कारवाई करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात ‘लक्ष्मीपूजा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 00:35 IST