विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप विटा : विटा ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या लेंगरे (ता. खानापूर) येथील सौ. आरती राजू चंदनशिवे (वय २३) या विवाहितेचा प्रसुतीनंतर अवघ्या अर्ध्या तासातच मृत्यू झाल्याची घटना दि. ३ मे रोजी घडली असून, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. सौ. आरती यांना दि. ३ मे रोजी दुपारी विटा ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. दुपारी २ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी मुलाला जन्म दिला. मात्र, त्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता. त्यानंतर रुग्णाची अवस्था गंभीर झाल्यानंतर डॉ. शशिकांत भिसे यांच्यासह काही डॉक्टर त्याठिकाणी आले, असे आरती यांचे पती राजू यांनी सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी विट्यातील कोणीही डॉक्टर दाखल करून घेणार नाहीत, त्यामुळे आरती यांना सांगलीला हलवा, असा सल्ला नातेवाईकांना दिला. त्यानंतर त्यांना त्याच अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पण वॉर्डात नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रसुतीनंतर रक्तस्राव झाल्याने व विट्यात वैद्यकीय उपचार वेळेत न मिळाल्यामुळे आरती यांचा मृत्यू झाला असून, या घटनेला विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याने त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांसह राष्टÑवादीच्या मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कांबळे यांनी आरोग्य मंत्रालय सचिवांकडे केली आहे. (वार्ताहर)
प्रसुतीनंतर लेंगरेच्या महिलेचा मृत्यू
By admin | Updated: May 8, 2014 12:30 IST