कोल्हापूर : शेताकडे निघालेल्या वृध्देच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून धूम स्टाईलने पलायन केले. ही घटना महे (ता. करवीर) मार्गावर सोमवारी सकाळी घडली. याबाबत शालाबाई पंडित शेळके (वय ६०, रा. शेळकेवाडी, वाशी (ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शालाबाई शेळके या वाशी येथे पती, मुलगा, सून, नातू यांच्यासह राहतात. त्यांचे महे रोडवर शेत आहे. सोमवारी सकाळी त्या शेताकडे जात होत्या. त्याचवेळी पाठीमागून एका दुचाकीवरून दोघे आले, त्यापैकी पाठीमागील स्वार दुचाकीवरून खाली उतरला व त्याने शेळके यांना, ‘येथे दीपकचे शेत कोठे आहे’ असे विचारले. त्यावेळी त्या उत्तर देत असतानाच त्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसडा मारून पुन्हा दुचाकीवर बसून दोघे धूम स्टाईलने महे गावाच्या दिशेने पसार झाले. त्यावेळी भांबावलेल्या शेळके यांनी आरडाओरडा केला, तोपर्यंत चोरट्यांनी पलायन केले होते.
त्यांनी या चोरीची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दिली. दोघा चोरट्यांचे वय अंदाजे ४० ते ४५ होते. दुचाकीचालक चोरट्याचे टक्कल होते, तर त्याच्या अंगात पिवळ्या रंगाचा टीशर्ट होता, असे त्यांनी वर्णन पोलिसांना सांगितले.