नृसिंहवाडी : कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील लाडू प्रसादाबाबत अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईची कसून चौकशी करणार असून, दोषींवर योग्य त्या कारवाईचे आश्वासन अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.आज, बुधवारी दुपारी विद्या ठाकूर यांनी येथील श्री दत्त मंदिराला भेट देवून दर्शन घेतले. यावेळी आ. उल्हास पाटील उपस्थित होते. दत्त देव संस्थानच्यावतीने त्यांचे स्वागत करून त्यांना देवस्थानचे अध्यक्ष संजय पुजारी, सचिव सोमनाथ पुजारी यांनी शाल, श्रीफळ व दत्त प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त राजेश खोंबारे, शशिकांत बड्डपुजारी, नरहर खोंबरे उपस्थित होते.पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाल्या, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरातील लाडू प्रसादाबाबत व्यक्तीश: माहिती घेणार असून, योग्य ती कारवाई करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सध्या महाराष्ट्रात असणाऱ्या कुपोषित बालकांची वाढती संख्या रोखण्यासाठी तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना सकस आहार, योग्य औषधोपचार याबाबत ठोस उपाययोजना करून येत्या सहा महिन्यांत कुपोषित बालकांची संख्या निम्म्याहून अधिक कमी करण्याचा प्रयत्न असून, कुपोषणमुक्त महाराष्ट्र करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत त्या म्हणाल्या, प्रत्येक पोलीस स्थानकात महिला कक्ष स्वतंत्र नेमण्यात येणार असून, हेल्पलाईन व कॉन्सलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अत्याचारित महिला व मुलींनी राजकीय, प्रशासकीय अन्य कोणतीही सामाजिक भीती न बाळगता हेल्पलाईनचा वापर करावा, त्याची गुप्तता ठेवण्यात येणार असून, अत्याचार करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.यावेळी तहसीलदार सचिन गिरी, भाजप तालुकाध्यक्ष महावीर तकडे, शहर अध्यक्ष संजय शिरटीकर, तालुका उपाध्यक्ष विकास पुजारी, उदय शिरटीकर, बाळू आलासकर, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजय मगदूम, अक्षय सावकार, पोपट पुजारी, मीनाक्षी पाटुकले, अनिल शिकलगार, विनोद पुजारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.( वार्ताहर )
लाडू प्रसादाची चौकशी करणार
By admin | Updated: December 31, 2014 23:55 IST