राजाराम लोंढे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या दिग्गज मंडळींचा प्रवास हा ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेतूनच झालेला आहे. विधानसभेचे माजी सभापती दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर, माजी आमदार नामदेवराव भोईटे, दिनकरराव जाधव, राऊ धोंडी पाटील व खासदार धैर्यशील माने यांचे राजकीय नेतृत्व ग्रामपंचायतीतूनच घडले आहे.
ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. काही अपवाद वगळता प्रत्येक राजकीय व्यक्तीची सुरूवात ही ग्रामपंचायतीपासूनच होते. काहीजण पंचायत समिती व जिल्हा परिषदेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात करतात. या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच पुढे गेलेल्या व्यक्तींनी विधीमंडळाबरोबरच संसद गाजवली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समितीमध्ये केलेल्या कामाच्या अनुभवाचा फायदा त्यांना विधीमंडळात झाल्याचे पाहावयास मिळते. स्थानिक पातळीवर काम केल्याने सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण त्यांना अधिक असते. ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केलेले धैर्यशील माने यांनी व्हाया जिल्हा परिषद ते संसदेपर्यंत धडक मारली. नामदेवराव भोईटे यांचा कसबा वाळवेचे सरपंच ते आमदार व दिनकरराव जाधव यांचा तिरवडेचे सरपंच ते आमदार असा प्रवास राहिला. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी कानडेवाडीचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, कृषी सभापती, आमदार, राज्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष अशी मोठी झेप घेतली होती.
असे घडले नेतृत्व -
धैर्यशील माने : रूकडी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, खासदार
हसन मुश्रीफ : पंचायत समिती सदस्य, सभापती, आमदार, मंत्री
संजय मंडलिक : जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, खासदार
प्रकाश आबीटकर : जिल्हा परिषद सदस्य, आमदार
भरमूण्णा पाटील : जिल्हा परिषद सदस्य, सभापती, आमदार, राज्यमंत्री
संजय घाटगे : पंचायत समिती सदस्य, सभापती, आमदार
सत्यजीत पाटील : जिल्हा परिषद सदस्य, आमदार
राजू शेट्टी : जिल्हा परिषद सदस्य, खासदार
राऊ धोंडी पाटील : पेरीड ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती, आमदार
नामदेवराव भोईटे : कसबा वाळवे सरपंच, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार
दिनकरराव जाधव : तिरवडे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार
स्वर्गीय बाळासाहेब माने : जिल्हा परिषद, उपाध्यक्ष, अध्यक्ष, पाचवेळा खासदार
स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक : जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम सभापती, आमदार, राज्यमंत्री, खासदार
स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर : कानडेवाडीचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, कृषी सभापती, आमदार, राज्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष
स्वर्गीय नरसिंगराव पाटील : जिल्हा परिषद सदस्य, आमदार