अशोक खाडे
कुंभोज : एक जागा बिनविरोध झाल्याने सोळा जागांसाठी होणाऱ्या कुंभोज येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महाविकास, तसेच लोकविकास आघाडीने ‘डोअर टू डोअर’ प्रचाराने गाव पिंजून काढले आहे. सहापैकी तीन प्रभागांत नेत्यांच्या प्रतिष्ठेची, तर उर्वरित प्रभागांत अटीतटीच्या लक्षवेधी लढती होणार असल्याचे संकेत मिळत असून, दोन्ही आघाडींकडून ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.
नेत्यांच्या घरच्या उमेदवारी मागे घेण्याचा कळीचा मुद्दा ठरल्याने, तसेच प्रमुखांच्या कचखाऊ प्रयत्नांमुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अपेक्षितपणे जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजप, तसेच जय शिवराय किसान संघटनाप्रणीत वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, बापूसाहेब पाटील, सदाशिव कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील लोकविकास आघाडी, तसेच काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनाप्रणीत बाबासाहेब चौगुले, किरण माळी, प्रकाश पाटील, किरण नामे, डाॅ. सत्यजित तोरस्कर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीदरम्यान दुरंगी सामना होत आहे. महाविकास आघाडीतील तीन नेत्यांपैकी प्रभाग एकमध्ये महाविकास आघाडीतून जवाहरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांचा मुलगा, प्रभाग दोनमध्ये स्वाभिमानीचे प्रकाश पाटील यांच्या भावजय, तसेच प्रभाग पाचमध्ये काँग्रेसचे किरण माळी यांच्या पत्नी रिंगणात असून, या सर्वांनीच तगडे आव्हान निर्माण केले आहे. प्रभाग चारमधील सख्ख्या चुलत भावांदरम्यानची, तसेच प्रभाग दोन व तीनमधील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. प्रभाग सहामध्ये अपक्षांची भाऊगर्दी असून, त्यांचे दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान निर्माण होत आहे. प्रभाग चार व सहामधील बहुतांश उमेदवार आघाडीच्या झेंड्याशिवाय लढत असून, त्यांच्या विजयाची भिस्त समाजाचे पाठबळ, तसेच सामाजिक कार्यावर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.