लोकमत न्यूज नेटवर्क ,
कोल्हापूर : काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि त्यातूनही सामाजिक संदेश देण्यात कोल्हापूरकर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरचे सुपुत्र रजत ओसवाल यांनी चक्क ऑटो रिक्षातून २७ दिवसांत पाच हजार ६४० किलो मीटरचा टप्पा पार करीत उत्तर भारताची सफर पूर्ण केली. या मोहिमेत त्यांनी पर्यावरण व सामाजिक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. शनिवारी ते मोहीम पूर्ण करून कोल्हापुरात आले असता त्यांचे स्वागत न्यू पॅलेस येथे शाहू छत्रपती यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
हिमालयाच्या पर्वतरांगांनी नटलेला उत्तर भारत हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आजवर सायकल, बुलेट आणि चारचाकीमधून अनेकांनी उत्तर भारताचा साहसी प्रवास केला आहे; पण ऑटो रिक्षातून हा साहसी प्रवासाचा पहिलाच प्रयत्न रजतने केला. कोल्हापुरातून २० डिसेंबरला मनाली, ऋषीकेश दौऱ्यासाठी रजत आणि त्यांच्या सहकारी डॉ. नम्रता सिंग रवाना झाल्या. या दरम्यान विविध राज्यांत त्यांना अतिशय चांगले अनुभव आले. प्रवासादरम्यान विविध राज्यांतील पोलिसांनी त्यांना चहा, नाष्टा, जेवण आणि प्रवासात संरक्षण दिलं. वाहन दुरुस्तीसाठी अनेक ट्रकचालकांनी साहाय्य केले. मोहिमेदरम्यान बर्फ पडत होता. त्यामुळे त्यांच्या सहकारी सिंग आजारी पडल्या. त्यामुळे त्यांना मोहिमेतून माघार घ्यावी लागली. गुजरात, राजस्थान, पंजाब, हिमाचल असा पाच हजार ६४० किलोमीटरचा साहसी प्रवास करून रजत शनिवारी कोल्हापुरात दाखल झाले.
या प्रवासादरम्यान त्यांनी गावोगावी जात स्तनाचा कर्करोग आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. दक्षिण भारत आणि कॅनडाचा दौरा करणार असल्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. यावेळी जयेश ओसवाल, तेज घाटगे, अभिषेक मोहिते, अस्कीन आजरेकर, योगेश परमार, प्रवीण चव्हाण, दिनेश राठोड, सुमित रायगांधी, प्रतापसिंह घोरपडे, मनोज जाधव, राजेंद्र दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो : १६०१२०२१-कॉल-रजत
फोटो ओळी : कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे रिक्षातून उत्तर भारताची सफर पूर्ण करून दाखल झालेल्या रजत ओसवाल यांचे स्वागत शाहू छत्रपती यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
( छाया : आदित्य वेल्हाळ)